फडणवीस यांनी नाही तर मराठा संघटनेने मागणी केली – महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी

Devendra Fadnavis - Ashutosh Kumbhakoni

मुंबई : “मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मी कोर्टात बाजू मांडू नये, यासाठी मराठा समाजाने (Maratha Community) तत्कालीन फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीला मान देऊन मी मराठा आरक्षणाच्या सुनावणीपासून दूर राहिलो.” असा गौप्यस्फोट महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी टीव्ही – ९ वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

कुंभकोणी म्हणाले – मराठा समाजाला अजूनही असेच वाटत असेल, तर मी यापासून संपूर्णपणे अलिप्त राहीन. मात्र, कोणत्याही वकिलावर अविश्वास दाखवू नका. मराठा आरक्षणाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. आमच्यावर होणारे आरोप चुकीचे आहेत. यापुढच्या कायदेशीर बाबींवरून लक्ष ढळू देऊ नका, आरक्षणाचा संपूर्ण फायदा संबंधितांना मिळाला पाहिजे. वकिलांवर आरोप करून काहीही साध्य होणार नाही. असे आरोप केल्याने त्याचे विपरीत परिणाम होतील.

मी कोर्टात बाजू मांडू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र तरीही याबाबत आवश्यक ती मेहनत घेतली. त्यानंतर सरकारने तुम्ही बाजू मांडू नका, अशी विनंती मला केली. त्यामुळे फडणवीस सरकारचा मान राखून मी कोर्टात प्रत्यक्ष बाजू मांडली नाही. समाजाचा आणि तत्कालीन सरकारचा मान राखला, असे ते म्हणालेत.

हायकोर्टात मराठा आरक्षण टिकले याला सर्वांची मेहनत कारणीभूत आहे. मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न केलेत. कुठेही यात लक्ष द्यायला कमी पडलो नाही. पण, मराठा समाजाला अजूनही वाटत असेल, तर या प्रकरणापासून मी पूर्णपणे बाजूला व्हायला तयार आहे, असे कुंभकोणी यांनी सांगितले.

न्यायालयाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. कोणत्याही वकिलावर वैयक्तिक टीका करू नका. मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. त्यावरून लक्ष विचलित करू नका, अशी विनंतीही त्यांनी मराठा समाजाला केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER