महाराष्ट्रात १३०० नव्हे, ९० शाळा बंद; केजरीवालांना तावडेंचे उत्तर

Arvind kejariwal-vinod tawade

मुंबई : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या होत्या. आता तेच विनोद तावडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याचे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर विनोद तावडे यांनी केजरीवालांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तावडे म्हणाले, केजरीवाल यांचे विधान म्हणजे आणखी एक झूठ आहे. महाराष्ट्रात कधीच १३०० शाळा बंद झाल्या नाहीत.

राज्यात सुमारे ९० शाळा बंद झाल्या होत्या. त्यामध्ये फक्त दोन ते तीन मुलं शिकत होती. त्या त्या शाळांमधील मुलांना जवळपासच्या शाळांमध्ये विलीन करून प्रवेश देण्यात आला व शिक्षण सुरू ठेवण्यात आले. मात्र केजरीवाल खोटा प्रचार करत असून दिल्लीकरांची दिशाभूल करत असल्याचे तावडे म्हणाले. मी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे केजरीवालांनी धसका घेतल्याचे दिसत असल्याचा टोलाही तावडेंनी लगावला. भाजपच्या खासदारांनी दिल्लीच्या शि‍क्षणाविषयी केलेल्या पोलखोलमुळे केजरीवाल धास्तावले असल्याचे तावडे म्हणाले.

केजरीवाल म्हणाले, आता महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणारे तावडे दिल्लीत प्रचार करणार

महाराष्ट्रामध्ये शाळेचा निकाल हा नववी, दहावीमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर ठरवण्यात येतो. नववीमध्ये मुलांना मुद्दाम नापास करून दहावीचा निकाल आम्ही ठरवत नाही, असाही टोला तावडे यांनी केजरीवाल यांना लगावला. असरच्या अहवालात महाराष्ट्रातील शासकीय शाळांमधील दर्जा हा खासगी शाळांपेक्षा अधिक चांगला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याची माहितीही केजरीवाल यांनी घ्यावी, असा सल्ला यावेळी विनोद तावडे यांनी दिला.