उत्तर कोरियाकडून जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात जाऊन पडले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता लक्षात घेतल्यास वॉशिंग्टन आणि अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतो. उत्तर कोरियाची ही कृती म्हणजे जगासाठी धमकी असून ‘बघून घेऊ’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. उत्तर कोरियाचा हा खेळ हा संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे, असं अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटीस यांनी म्हटलं आहे. तर, हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा जपानने दिला आहे. उत्तर कोरियाच्या या आगळिकीमुळे जगात पुन्हा एकदा अशांततेचे वातावरण पसरले आहे. उत्तर कोरियाच्या दक्षिण प्योंगयांग प्रांतातून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांच्यानुसार, हे उत्तर कोरियाचे सर्वाधिक अंतराचा टप्पा गाठू शकणारे क्षेपणास्त्र (आंतरखडीय क्षेपणास्त्र) होते.

जगातील कोणत्याही भागाला लक्ष्य करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती उत्तर कोरियाकडून सुरु असल्याचेही मॅटिस यांनी म्हटले. ‘या प्रकरणात आपण लक्ष घालू,’ असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. तर जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी उत्तर कोरियाचे हे कृत्य हिंसक असल्याचे म्हटले. उत्तर कोरियाची ही कृती सहन केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. आबे यांनी या प्रकरणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियानेही सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी सकाळी ही बैठक होणार आहे. ‘आम्ही प्योंगयांग क्षेपणास्त्र चाचणीवरुन जास्तीत जास्त दबाव आणणार आहोत,’ असे शिंझो आबे यांनी सांगितले. अमेरिकेकडून उत्तर कोरियावर निर्बंध लादले गेल्यानंतरच्या अवघ्या काही दिवसांमध्ये प्योंगयांगमधून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. याबद्दल बोलताना ट्रम्प यांनी, ‘उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र डागले असून आम्ही या प्रकरणात लक्ष घालू. संरक्षणमंत्र्यांशी याबद्दल चर्चा झाली असून आम्ही हे प्रकरण व्यवस्थित हाताळू,’ अशी माहिती पत्रकारांना दिली. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. याआधी १५ सप्टेंबरला उत्तर कोरियाने शेवटची क्षेपणास्त्र चाचणी केली होती. यानंतर दोन महिने या भागात शांतता निर्माण झाली होती. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी उ. कोरियाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. येत्या २०१८पर्यंत हा देश आण्विक क्षेपणास्त्रे लॉन्च करण्यात सक्षम होईल, अशी भीती दक्षिण कोरियानं व्यक्त केली आहे.