नोटाबंदी अपशकुनी निर्णय : मनमोहन सिंग

Manmohansingh-Modi

नवी दिल्ली :- नोटाबंदी हा देशासाठी अपशकुनी निर्णय असून हे रुग्ण मानसिकतेचं लक्षण आहे’, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. नोटाबंदीला आज २ वर्ष पूर्ण झाले. विरोधी पक्ष या निर्णयाच्या विरोधात आज निषेध दिन पाळत आहेत. या निमित्त मनमोहन सिंग यांनी ट्विटरवरून केंद्रातील भाजपा सरकारवर ट्विटमधून हल्ला चढवला. ते म्हणतात – ‘नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याचं स्पष्ट दिसत आहे. नोटाबंदीमुळे प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो होरपळून गेला आहे. खरे तर काळाच्या ओघात जखमा भरून निघतात असं म्हटलं जातं. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले घाव भरण्याऐवजी चिघळत आहेत’.

‘नोटाबंदीमुळे जीडीपीचे दर घसरले आहेत. त्याचे परिणाम दिसत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले लघू आणि मध्यम उद्योग नोटाबंदीमुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. अर्थव्यवस्थेत सतत चढउतार येत असल्याने त्याचा रोजगारावरही परिणाम होत आहे. तरुणांना नोकऱ्या मिळणं मुश्किल झालं आहे. पायाभूतसुविधांसाठी दिलं जाणारं कर्ज आणि बँकाच्या इतर सेवांवरही परिणाम झाला आहे. नोटाबंदीमुळेच रुपयाची घसरण होत असून त्याचा सुक्ष्म अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे‘, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीला ‘काळा दिवस’ म्हटले आहे. ‘सरकारने नोटाबंदी सारखा घोटाळा करून देशातील जनतेची फसवणूक केली आहे. या निर्णयानं अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांचं आयुष्य बर्बाद केलं आहे. ज्या लोकांनी नोटाबंदी केली त्यांना जनता शिक्षा करेल’, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आजच्या दिवसाला ‘आपत्ती’ म्हटलं आहे. नोटाबंदीमुळे नोटा छापण्यासाठी ८ हजार कोटींचा खर्च झाला. १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. १०० लोकांचे प्राण गेले आणि जीडीपीच्या दरात दीड टक्क्यांनी घसरण झाल्याची टीका थरूर यांनी केली आहे. काँग्रेसचे दुसरे नेते मनीष तिवारी यांनीही भाजपवर टीका केली आहे. ;नोटाबंदी ही शंभर लोकांचा बळी घेणारी घटना आहे. त्या घटनेला ७३० दिवस झाल्यानंतरही देशाची माफी मागावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत नाही’, अशी टीका तिवारी यांनी केली आहे.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही नोटाबंदीवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या संवेदनाहिनतेमुळे लाखो लोकांच्या आयुष्याची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. २००२ रोजी गुजरातमध्ये झालेल्या दंगली विसरण्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण आम्ही ते विसरलो नाही. तसंच २०१९ मध्येही नोटाबंदीचं स्मरण ठेऊ, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.