कोरोना ‘निगेटिव’ नसलेल्यांना गोव्यात सोमवारपासून प्रवेशबंदी

Bombay HC - Goa HC - Maharashtra Today
  • गोवेकरांच्या हितासाठी हायकोर्टाचा आदेश

पणजी : ज्यांच्याकडे ७२ तासांपूर्वी करून घेतलेला कोरोना चाचणीचा ‘निगेटिव’ अहवाल नसेल अशा बाहेरून येणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सोमवार, १० मेपासून गोव्यात प्रवेश दिला जाऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) गोवा खंडपीठाने (Goa High Court) दिला.

‘साऊथ गोवा अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन’ने केलेल्या याचिकेवर हा आदेश देताना न्या. एम.एस. सोनक व न्या. एम. एस. जवळकर यांच्या खंडपीठाने म्हटले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इतर राज्यांनीही असे उपाय योजलेले असल्याने खरं तर गोवा सरकारनेही हे पाऊल याआधीच उचलायला हवे होते. गोव्यात येऊ इच्छिणार्‍यांना याची पुरेशी पूर्वसूचना मिळावी यासाठी न्यायालयाने ही प्रवेशबंदी लगेच लागू न करता १० मेपासून लागू केली. दरम्यान सरकारला याची सर्व माध्यमांतून प्रसिद्धी करण्यास सांगण्यात एले.

खंडपीठाने म्हटले की, हा उपाय म्हणजे गोव्याच्या सीमा ‘सील’ करण्याचा प्रकार नाही. बाहेरून येणार्‍या लोकांमुळे गोव्यातील कोरोना संसर्गात भर पडू नये यासाठी ज्यांना कोरोना संसर्ग झालेला नाही अशाच व्यक्तींना प्रवेश देणे ही गोव्यातील नागरिकांच्या हितासाठी योग्य काळजी घेणे आहे.

हा आदेश लागू झाला तरी गोव्यात येणार्‍या जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात बाधा पडू नये यासाठी सरकार योग्य तो ‘प्रोटोकॉल’ तयार करून त्याची अंमलबजावणी करू शकेल. मात्र त्यातही जीवनावश्यक सामान घेऊन येणार्‍या वाहनांमधून कोणी ‘कोरोना पॉझिाटिव’ गोव्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी सरकार गोव्याच्या प्रवेश नाक्यांवर कोरोना चाचणीची सोय करू शकेल, असे न्यायालयाने नमूद केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button