सनबर्न उत्सवाचा मार्ग मोकळा

पुणे : सनातन संस्था आणि शिवसेनेन विरोध केल्यानंतरही पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तहसीलदाराने उत्सवाच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

सनबर्न उत्सव ज्या ठिकाणी होणार आहे, त्या जागेचे मालक दत्तात्रय पालसकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सनबर्न उत्सवाला परवानगी दिल्याची माहिती तहसीलदारांनी हायकोर्टात सादर केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकेवर पुढे सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, आजपासून तीन दिवसांच्या सनबर्न उत्सवाला सुरुवात होत आहे. पण हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने सनबर्न उत्सवाला जोरदार विरोध केला आहे. सनबर्नमुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात येईल, असा सनातनचा दावा आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्नला सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.