
नवी दिल्ली: कोरोना (Corona) महामारीची साथ अद्याप ओसरली नसल्याने संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार नाही. त्यामुळे कदाचित संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच जानेवारी महिन्यात भरविले जाण्याची शक्यता आहे. देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत.
त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे अधिवेशन लवकरात लवकर भरवावे, अशी विनंती काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी (Adhir ranjan Chowdhary) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहून केली होती. त्याचा संदर्भ घेऊन संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी चौधरी यांना पत्र लिहून अधिवेशनाच्या आयोजनासंबंधी वरीलप्रमाणे माहिती दिली आहे. जोशी पत्रात म्हणतात की, देशात व खासकरून दिल्लीत कोरोनाचा जोर पुन्हा वाढणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने थंंडीचे महिने खूपच महत्त्वाचे असणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मी सभागृतातील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी अनौपचारिक संपर्क साधला. तेव्हा या नेत्यांनी कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली व सध्याच्या परिस्थितीत संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेणे अधिक चांगले होईल, असे मत व्यक्त केले. संसदीय कार्यमंत्री पुढे लिहितात की, संसदेचे अधिवेशन लवकरात लवकर व्हावे असे सरकारलाही वाटते.
त्यामुळे कोरोनाने निर्माण केलेली अभूतपूर्व परिस्थिती विचारात घेता आता हिवाळी अधिवेशन न घेता पुढील वर्षाचे अर्थ संकल्पीय अधिवेशनच जानेवारीत घेणे योग्य होईल. संसदेचे पावसाळी अधिवेशनही कोरोनामुळे लवकर आटोपते घ्यावे लागले होते. त्या मर्यादित वेळातही २७ विधेयके मंजूर झाल्याने ते अधिवेशन खूप फलदायी ठरले, असेही मंत्र्यांनी पत्रात नमूद केले.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला