नको टिचिंग… हवी अ‍ॅक्टींग

Sanchit Chaudhari

मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी अधिक जाणून घेत असताना ही गोष्ट अनेकदा समोर येते की तो कलाकार म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी वेगळ्याच क्षेत्रात नोकरी व्यवसाय करत होता. अभिनयापेक्षा वेगळं शिक्षण घेऊन काम सुरू केल्यानंतर त्यामध्ये मन रमत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अभिनयासाठीच झोकून दिले. इंडस्ट्रीत तर असे अनेक डॉक्टर, बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी म्हणून नोकरी व्यवसाय सोडून पूर्णवेळ अभिनयातच रमले. नोकरी व्यवसायात त्यांचे खिसे भरत होते पण मन भरत नव्हते. तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेतील रघू म्हणजे अभिनेता संचित चौधरी (Sanchit Chaudhari) हादेखील नको टिचिंग, हवी अ‍ॅक्टिंग असं म्हणत सरकारी शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडून अभिनयाकडे वळला आहे.

खर्‍या आयुष्यातील एकेकाळचा मानसशास्त्राचा शिक्षक म्हणून संचित नोकरी करत होता. संचित मूळचा नागपूरचा. त्याचे वडील शिक्षक असल्याने त्यांची अशी इच्छा होती की संचितनेही शिक्षक व्हावे. सुरूवातीला संचितलाही शिकवायला खूप आवडायचे. त्याच आवडीतून संचितने मानसशास्त्र या विषयात उच्चशिक्षण घेतले. सरकारी शाळेत शिक्षक म्हणून त्याने कामही सुरू केले, तर काही दिवस तो कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही रूजू झाला. अभिनय त्याला आवडायचा. संचित सांगतो, शाळेत मुलांचे नाटक बसवत असताना मीच स्क्रिप्ट लिहायचो. कॉमेडी शो बघून मला स्किट लिहायचीही आवड लागली. अभिनयाच्या आवडीतून नागपूरमधील रंगरसिया थिएटर या नाट्यसंस्थेतून मी काही प्रायोगिक नाटकं केली. त्यानंतर मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये काही शो सादर केले. दरम्यान मी आवाजावर काम केलं आणि डबिंगचे तंत्र शिकून घेतले. अर्थात हे सगळं नोकरी सांभाळून सुरू होतं. पण मी जितका या अभिनय, डबिंग, स्क्रिप्ट लेखन क्षेत्रात काम करायला लागलो तशी मला जाणीव झाली की वर्गात शिकवण्यापेक्षा मला जास्त आनंद थिएटरमध्ये, स्टुडिओमध्ये मिळतोय. मग मात्र एके दिवशी मी नोकरी सोडून अभिनयातच करिअर करायचे ठरवले.

संचितसाठी हा निर्णय सोपा होता का हा प्रश्न साहजिकच संचितची शैक्षणिक पाष्र्वभूमी पाहता त्याच्या चाहत्यांच्या मनात येऊ शकतो. संचितसाठी हा बदल फार अवघड नसला तरी त्याच्या वडीलांकडून त्याला कसा पाठिंबा मिळतोय हे खूप महत्त्वाचे ठरणार होते. संचितच्या वडीलांमधील शिक्षकानेच ही कमाल केली. एका विद्यार्थ्यासाठी त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे महत्त्व संचितच्या वडीलांना शिक्षक म्हणून माहित होते. मग काय, वडीलांचे पाठबळ मिळाल्यावर संचितने त्याची वाट मुंबईकडे वळवली. संचितला पहिला ब्रेक मिळाला तो प्रेमाचा गेम सेम टू सेम या मालिकेतून. पहिल्याच मालिकेत दुहेरी भूमिका साकारण्याचे आव्हान संचितने पेलले. आता सध्या तो तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेत एका गुंड प्रवृत्तीच्या युवकाची भूमिका करत आहे. संचित सांगतो की सध्या मी ज्या रघूच्या रूपात दिसत आहे तो वाईट मुलगा नाही. पण वाईटासाठी जशास तसे उत्तर देणारा हा नायक आहे. त्यामुळे चांगल्यावाईटातील बाँड्रीलाइन जपत रघू साकारताना खूप मजा येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER