
रत्नागिरी(प्रतिनिधी): चिपळूण शहरातील प्रभाग क्र. ५ मधील वाणीआळी येथे मुरलीधर मंदिर ते राऊतआळी गणपती मंदिरपर्यंतचा रस्ता येत्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त न केल्यास नगर परिषदेचे कोणतेही कर भरणार नसल्याचे पत्र नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना दिले.
मुरलीधर मंदिर ते राऊतआळी गणपती हा रस्ता खराब झाला आहे. पवारआळी, दादर मोहल्ला, मिठागरी मोहल्ला, मुरादपूर, रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र हायस्कूल या भागामध्ये जाण्यासाठी हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याला खड्डे पडले आहेत. हा रस्ता करण्यास सुरुवात झाली होती.
मात्र, गटार झाल्याशिवाय रस्ता करण्यास नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर गटाराचे काम पूर्ण झाले व मार्च २०२० मध्ये ठेकेदाराने रस्त्याचे काम पुन्हा चालू केले असताना काही कारणास्तव ते थांबविण्यात आले. नगर परिषदेचे सर्व कर भरूनही नागरिकांना खड्ड्यातून जावे लागते. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही कर भरण्यात येणार नाहीत, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला