स्वतः रोजगार दिला नाही आणि दाराशी चालून आलेला घालवतायत- मिलींद कीर

रत्नागिरी/प्रतिनिधी :- स्वतः गेली पंधरा वर्षे सत्तेचे लाभ उपभोगतायत, मंत्रीपदे मिरवतायत मात्र तरूणांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी तो न मिळण्यासाठीच रत्नागिरीच्या आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची आजवरची भूमिका आहे. स्वतः रोजगार द्यायचा नाही आणि दाराशी चालून आलेल्यावर लाथ घालायची अशी यांची भूमिका आहे. ते फक्त सहकारी आमदाराच्या मतदारसंघात ढवळाढवळ करून तिथे येणारा आणि रोजगार देणारा प्रकल्प हाकलून देण्यासाठीच प्रयत्न करतायत. लोकप्रतिनिधीची भूमिका विकासालाच खीळ घालणारी कशी काय असू शकते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उदय सामंत यांना लगावला.

विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन विद्यापीठाचा निर्णय : उदय सामंत

श्री. कीर म्हणाले की, रत्नागिरीच्या विकासासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रोजगार संधी जनतेला उपलब्ध करून दिल्या नाहीत, त्याचवेळी निव्वळ प्रदूषण हे एकच कारण पुढे करून राजापुर तालुक्यात येणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला विरोध करून महत्त्व वाढविण्याचे काम मंत्रीमहोदय करताना दिसत आहेत. हा प्रकल्प आणि हा प्रश्न राजापूर मतदार संघातला आहे. तिथे त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. परंतु त्यांनाही डावलून मंत्रीमहोदय स्वत:च हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

ज्याप्रकारणे वाटद खंडाळा येथे येऊ घातलेला प्रकल्प त्यांनी अडवला त्याप्रमाणे या राजापूर भागाला रोजगार देणारा, विकास करणारा प्रकल्प अडविण्याचे काम करून इथल्या तरूणांना बेरोजगार करण्याचे महापाप हे मंत्री करत आहेत. यामध्ये जनतेच्या विकासापेक्षा त्यांचाच स्वार्थ अधिक दिसून येत आहे अशा प्रकारे मिलिंद कीर यांनी रत्नागिरीच्या आमदारांवर शरसंधान केले आहे.