गुडेवारांशी भांडण नाही, मात्र समन्वयाने काम करावे

आमदार सुरेश खाडेंचा यु-टर्न

Dr. Suresh Khade

सांगली : जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याशी माझे भांडण झालेले नाही, आत्तापर्यंत कधीही त्यांच्याशी कामाबाबत चर्चाही झालेली नाही. गुडेवार यांच्या बदलीबाबत अन्य आमदारांनी पत्र दिले आहे. तुम्हीही द्या, असे सदस्यांनी सांगितल्याने पत्र दिले होते, असा यु-टर्न भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी मंगळवारी घेतला.

जिल्हा परिषदेत कडक शिस्तीचे अधिकारी असलेले प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांची बदली करावी, अशी मागणी आमदार खाडे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मश्रीफ यांच्याकडे केली आहे, याबाबतची चर्चा चांगलीच रंगली असताना खाडे मंगळवारी थेट जिल्हा परिषदेत आले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेतील काही सदस्य माझ्याकडे आले होते. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी प्रभारी सीईओ गुडेवार यांच्या बदलीसाठी पत्र दिल्याचे सांगण्यात आले. त्या पत्रावरुन गुडेवार हे विश्वासात न घेता काम करतात, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला बाधा येत आहे. त्यामुळे गुडेवार यांची बदली करावी, असे पत्रात लिहीले होते. मी एक विरोधी पक्षाचा आमदार आहे. विरोधी पक्षाच्या आमदाराने अधिकाऱ्यांची बदली करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर ती बदली झाली तर विशेष होईल. माझ्या पत्राने गुडेवारांची बदली होणार नाही, त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावा लागतो. काही दिवसांपूर्वी मी जिल्हा परिषदेत आलो होतो, त्यावेळी गुडेवार यांचे सर्वांच्यापुढे कौतुक केले होते.

वैयक्तिक माझे आणि गुडेवार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, संवाद झालेला नाही, त्यामुळे भांडण होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची एक चांगल्या शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख आहे. नियमावर बोट ठेवून काम केले पाहिजे, मात्र पदाधिकारी व सदस्यांशी समन्वय ठेवून काम केले पाहिजे. जर कुणाकडून चुकीचे काम होत असेल तर त्यांना पाठीशी घालता कामा नाही. त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे, असे खाडे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER