नो पब्जी…ओन्ली आज्जी

No pubji only grandma

कधी आजीच्या कुशीत झोपलेला तर कधी आजीकडून केसांना तेल लावून घेणारा, कधी आजीला फोनमधील एखादा मजेशीर व्हिडिओ दाखवणारा तर कधी आजीसोबतचा फोटो स्टोरीबॉक्समध्ये अपलोड करणारा भूषण प्रधान आपल्याला त्याच्या सोशल मीडिया पेजवर नेहमीच भेटतो. या आहेत प्रधानांच्या घरातील बॉस अशी भन्नाट कॅप्शन देत भूषण त्याच्या आजीसोबतचे खास क्षण शेअर करत असतो. त्यामुळे आता कोणता नवा सीन भूषण आजीसोबत खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगणार आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना कायमच असते. यावेळी भूषण आणि त्याची एव्हरग्रीन आजी दोघे बुद्धीबळाचा पट मांडून बसले आहेत आणि त्यांच्यात चेकमेट सुरू आहे असा फोटो नुकताच भूषणने त्याच्या इन्स्टापेजवर शेअर केला. या फोटोला तर प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेतच पण या फोटोला भूषणने जे शीर्षक दिलेय त्याचीच चर्चा जास्त झालीय. या फोटोच्या वर नो पब्जी… ओन्ली आज्जी असे टायटल दिलेय.

पिंजरा या मालिकेतील वीर या भूमिकेने भूषणला घराघरात पोहोचवले. सर्वात लोकप्रिय मराठी चेहरा या स्पर्धेत सर्वाधिक लाइक्स मिळवणारा भूषण एकही दिवस व्यायाम आणि त्याचे डाएट चुकवत नाही. लॉकडाउनमध्येही त्याचे डाएट फूड आणि व्यायामाचे व्हिडिओज सोशल मीडियावर झळकत होते. त्याने ऑनलाइन दाखवलेला डाएट ज्यूस त्याच्या चाहत्यांनी घरी करूनही पाहिल्याच्या कमेंटसनी त्याचा इनबॉक्स भरला आहे. सतरंगी रे, राया, कॉफी आणि बरच काही, टाइमपास, ती आणि इतर, मिस मॅच, तू तिथे असावे, आम्ही दोघी या सिनेमांमध्ये दिसलेल्या भूषणच्या लूकवर कित्येक मुली फिदा आहेत.

भूषण त्याच्या आईचा जितका लाडका आहे तितकाच तो त्याच्या आजीचाही लाडका आहे. आजीसोबतचे फोटो, व्हिडिओ भूषणने इतक्यांदा शेअर केले आहेत की भूषणच्या आजीनाही भूषणचे फॉलोअर्स ओळखायला लागले आहेत. कोरोना साथीला चीन कारणीभूत असल्याने चिनी अॅप्सना बंदी घालण्याचा धडाका गेल्या काही दिवसात सरकारने लावला आहे. यामध्ये ऑनलाइन अॅप वापरात हिटलिस्टवर असलेल्या पब्जी अॅपवर गेल्या आठवड्यात बंदी आली. भूषणच्या मोबाइलमध्येही हे अॅप होते. पण आता सरकारची बंदी आल्यानंतर ते ऑफस्क्रीन झाले. याच पार्श्वभूमीवर भूषण, त्याची आजी आणि या  दोघांचा चेकमेटचा खेळ रंगला. आता हा क्षण क्लिक करून तो इन्स्टावर आला नसता तरच नवल. बुद्धीबळाचा डाव ऐन रंगात आला आहे, समोर आता पुढे काय चाल घ्यायची या विचारात भूषण आणि त्याची आजी तल्लीन झाले आहेत असा फोटो भूषणच्या पेजवर झळकला देखील.

या फोटोमध्ये भूषणला केवळ हा फोटो अपलोड करणं एवढाच उद्देश नाही तर खरोखरच चायनीज अॅप्सनी भारतीयांना किती अधीन केलं होतं. या मोबाइल अॅप, गेममुळे आपण आपले खेळ विसरून गेलो होतो हेदेखील सांगायचे होते. बुद्धीबळासारख्या खेळात आज किती घरातील कुटुंबीय रंगतात हा प्रश्नही भूषणने या फोटोच्या निमित्ताने मांडला आहे. एकाग्रता आणि विचारशक्तीला चालना देणाऱ्या बुद्धीबळाच्या खेळाची मुलांना आवड लागली पाहिजे. मैदानी खेळही या मोबाइल गेममुळे हरवत चालले आहेत. लहान असताना आजीसोबत असे अनेक खेळ भूषण खेळला आहे. पण जसा तो मोठा झाला, अभिनयक्षेत्रात स्थिरावला तसा पारंपरिक खेळापासून लांब गेला. पण आता मोबाइलमधून पब्जी गायब झाल्यांनतर भूषणला त्याचे बालपण आठवले. लगेच त्याने घरातला पट काढला आणि आजीसोबत डाव मांडला. सतत मोबाइल गेम, जिम यामध्ये रमणारा आपला तरूण नातू माझ्यासोबत चेस खेळतोय याचा आनंद आजींच्या चेहऱ्यावरही झळकला.

भूषण सांगतो, कोरोना, लॉकडाउन या काळात खूप प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकांच्या मनात ताणतणाव वाढले आहेत. आर्थिक गणितं बिकट बनली आहेत. पण संयम हेच यावरचे उत्तर असेल. अशावेळी आपण आपल्या कौटुंबिक आनंदात किती आणि कसे रमतो यावर या फेजमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणार आहे. आजीसोबत खेळ खेळताना, जुन्या आठवणी जगताना इतका आनंद मिळाला की जो आजपर्यंत तासनतास मोबाइल गेम खेळून मिळाला नव्हता. भूषण आणि त्याच्या आजीचे हे नातं त्याच्या चाहत्यांना मात्र खूपच आवडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER