लोकलसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही- पीयूष गोयल

CM Thackeray-Piyush Goyal

मुंबई : एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल (Mumbai Local) कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. असं असताना १५ ऑक्टोबरपासून लोकल सुरू करण्याचा विचार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे अद्याप असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार, असा प्रश्न त्यांना विचारला असता, गोयल म्हणाले की, लोकल अथवा प्रवासी गाड्या सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नाही. जोपर्यंत राज्य सरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असे रेल्वे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल १५ तारखेपर्यंत सुरू करू, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेऐवजी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या नव्या कृषी कायद्यामुळे त्यांना कसा लाभ होईल याबद्दल जास्तीत जास्त बोलणे पसंत केले. “नव्या कृषी कायद्यामुळे वर्षानुवर्षे अडचणीत सापडलेल्या भारतातील शेतकऱ्यांना आम्ही बाहेर काढण्याचे काम केले आहे. या कायद्यामुळे येणाऱ्या वर्षात त्यांची प्रचंड प्रगती होईल. आता शेतकरी आपला माल थेट भारतातल्या कोणत्याही बाजारपेठेत जाऊन विकू शकतात. मात्र विरोधक आपला राजकीय हेतू साधण्यासाठी या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

याचप्रमाणे, सर्वांत पहिली किसान स्पेशल ट्रेन आम्ही सुरू केली, तीदेखील महाराष्ट्रतील देवळाली इथून, सुरुवातीला तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यानंतर सर्व ट्रेन भरभरून जात आहेत. शेतकऱ्यांचा माल हा थेट रेल्वे घेऊन जाईल. आता नितीन गडकरी यांनी मागणी केली. नागपूरला आता संत्र्याचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे तिथून किसान रेल चालवा, आम्ही त्याचे प्लॅनिंग आता करतो आहोत, असे गोयल म्हणाले.

कांदा निर्यातबंदीवरून अनेक आंदोलने झाली होती. त्यावरदेखील गोयल यांनी सरकारी बाजू मांडत, हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी ऑक्टोबरमध्ये पावसाची दाट शक्यता आहे, जर त्यामुळे कांद्याची शेती खराब झाली तर कांद्याचे भाव कुठे पोहचतील माहीत नाही. म्हणून आम्ही आधीच निर्यातबंद केली; पण त्यामुळे कांद्याच्या भावावर काही परिमाण झालेला नाही, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER