मुंबईत किंमत दिली नाही, मात्र आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत; संभाजीराजेंचा इशारा

MP Chhatrapati Sambhajiraje

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, असं म्हणत त्यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या १६ जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्या दिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

याशिवाय मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही, मात्र आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. ३६ जिल्ह्यांत आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाहीत; पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण टेक्निकली डोकं लावून भूमिका घ्यायची आहे. आता पहिली जबाबदारी माझी, त्यानंतर खासदार आणि त्यानंतर आमदारांची आहे. तुम्ही समाजासाठी काय करताय हे आमदार-खासदारांना कोणी विचारलं का? ही दिशा फक्त कोल्हापूरसाठी नाही तर राज्यासाठी असेल. ही भूमिका आक्रमक असेल पण टेक्निकल असेल, असं संभाजीराजे म्हणाले.

१० वर्षांनंतर कोणी बोट ठेवल अशी भूमिका मी घेणार नाही. आरक्षण नाकारल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोण चुकलं यावरच जास्त चर्चा सुरू झाली. चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी मार्ग सांगितले पाहिजेत. राजकीय खेळ सुरू झाल्यानेच मी आक्रमक भूमिका घेतली, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही. अजित पवार यांनी फक्त फोन केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न केला. शाहूंच्या भूमीतून आंदोलनं व्हावी अशी माझी भूमिका आहे. १६ तारखेला आपण समाजासमोर कसं जाणार आहोत, मला समजून घ्या, मी जी भूमिका घेईन ती समाजाच्या हिताची असेल. माझं उद्धव ठाकरे यांच्याशी चांगलं जमतं तसंच फडणवीस आणि अजित पवार यांच्याशीही जमतं, असं संभाजीराजेंनी नमूद केलं.

कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर आणि रायगड या चार ठिकाणी आंदोलन होणार असून कोल्हापूरमधल्या आंदोलनाप्रमाणेच राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार आहे. १२ तारखेला कोपर्डीला जाणार, तसंच जलसमाधी घेतल्या काकासाहेब शिंदे स्मारकालाही जाणार. आम्ही आमचा आक्रमकपणा सोडणार नाही. आमच्याशी खेळ करू नका, असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button