उपचाराअभावी कोणाचाही मृत्यू होता कामा नये; पवारांनी टोचले प्रशासनाचे कान

Sharad Pawar

पुणे :  पुण्यात वेळेत उपचाराच्या सुविधा न मिळाल्याने पांडुरंग रायकर या युवा पत्रकाराचा मृत्यू झाला. या बाबीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) बोट दाखवले आणि पिंपरीतल्या जम्बो  कोविड (Jumbo Covid) सेंटरमध्ये नेमके  कसे उपचार दिले जाताहेत हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जाताहेत  याबाबत राष्ट्रवादी (NCP), भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका आयुक्त टेंभा मिरवत होते. तेव्हाच पवारांनी सर्वांचे कान टोचले. तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होताहेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करूनही अनेक बाबी समोर येताहेत.

डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही, अशा तक्रारी येताहेत अशी खंतही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात; पण उपचाराअभावी कोणाचाही मृत्यू होता कामा नये, अशी सूचनाही पवारांनी यावेळी दिली. शहरातील कोरोना रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा गाठला आणि मृतांचा आकडा ९०० च्या घरात जायची वेळ आली असताना ही तात्पुरती रुग्णालये रिकामी का? असा प्रश्न उपस्थित होताच दस्तुरखुद्द शरद पवार अचानक पालिकेत आले. त्यांनी पालिका आयुक्त, भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाची इत्थंभूत माहिती घेतली. यावेळी सर्वांनी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना रुग्णांवर कसे यशस्वी उपचार दिले जाताहेत, याचा टेंभा मिरवला. तेव्हा पवारांनी सर्वांचे कान टोचले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER