जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा…

Shailendra Paranjapeमुंबईचे राजभवन ही एक ऐतिहासिक आणि दिमाखदार अशी वास्तू आहे. समुद्राच्या साक्षीने उभारलेले राजभवन हे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेच; पण हा परिसर अतिशय सुंदर आहे. सकाळी सकाळी येथे मोर बागडताना दिसतात. या परिसरात हेलिपॅड आहे आणि हेलिपॅडवर पिसारा पूर्ण खुलवलेल्या मोराचे फोटो गेल्याच आठवड्यात राजभवनकडून प्रसिद्धी माध्यमांना पाठविण्यात आले होते. राजभवनमध्ये मोर आहेत आणि ते छान पिसारा फुलवितात हे त्यावरून दिसले. त्यामुळे ‘राजभवन में मोर नाचा किसी ने ना देखा?’ असा सवाल राजभवनबाबत नक्कीच करता येणार नाही. राजभवन आणि मोराची आठवण येण्याचे कारण म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याची केलेली प्रशंसा.

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी शनिवारी संवाद साधला. त्यात अर्थातच कोरोनाच्या मृत्युसंख्येत महाराष्ट्र क्रमांक एकवर असल्याने आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे होतेच. या संवादानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्धीला दिले. ‘कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेत महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे’ या शब्दात मुख्यमंत्र्यांची प्रशंसा पंतप्रधानांनी केल्याचे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकार वा पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात काही पत्रक जारी केले आणि त्यात मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केल्याचे दिसत नाही. त्यामुळे ही जी काही प्रशंसा पंतप्रधानांनी केली म्हणतात त्याबाबत ‘जंगल में  मोर नाचा किसी ने ना देखा’ या ओळीची आठवण येत आहे. बरं पंतप्रधानांनी ही प्रशंसा कशासाठी केली असेल? महाराष्ट्रात तर दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक मृत्यू होत आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्याही महाराष्ट्रातच आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांत  उभी करता आलेली नाही हे वास्तव समोर आलेले आहे.

व्हेंटिलेटरच्या खरेदीत झालेला घोळ लपून राहिलेला नाही. कोरोनायोद्धा म्हणून लढत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता तर सोडाच; पण नियमित मानधनदेखील मिळालेले नाही म्हणून ते रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. हाफकिनच्या माध्यमातून होत असलेले खरेदीचे व्यवहार संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. कोरोनाच्या उपाययोजना, रेमडेसिवीर, आॅक्सिजनचा पुरवठा याबाबत काही जिल्ह्यांवर विशेष मर्जी दाखविण्यात आली आणि तिथे अधिक पुरवठा करण्यात आला. दबंग सत्ताकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्याचं तेवढं पाहिलं. बाकीच्यांना वाऱ्यावर सोडलं याची आकडेवारीच आहे. राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याला कोट्यापेक्षा तिप्पट कोरोना प्रतिबंधक लसी देण्यात आल्या याची बातमी इंडियन एक्स्प्रेससारख्या जबाबदार वृत्तपत्राने केलेली आहे. मग पंतप्रधानांनी प्रशंसा कशाची केली असेल बरं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये, ‘रोजी मंदावली असली तरी रोटी दिल्याशिवाय राहणार नाही’ असे टाळ्या घेणारे वाक्य उच्चारत साडेपाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून महिना उलटला पण अजून रिक्षावाले, फेरीवाले, बांधकाम कामगार, आदिवासी बांधव यांच्यापर्यंत  हे पॅकेज पूर्णत: पोहचलेच नसल्याच्या बातम्या वृत्तपत्रे देत आहेत, त्याची तर प्रशंसा केली नसेल ना?

मुंबई मॉडेल, मुंबई मॉडेल म्हणून खूप जास्त कौतुक सध्या होत आहे. मुंबई महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात कसे जबरदस्त यश मिळविले याचे कोडकौतुक सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्याचाही फुगा फोडला. कोरोनाने  होत असलेल्या मृत्यूंची नेमकी आकडेवारी कशी दिली जात नाही, कमी चाचण्या करून संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र कसे उभे केले जात आहे याचा लेखाजोखा त्यांनी आकडेवारीसह मांडला. पीआर यंत्रणेमार्फत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील कोरोनाची मृत्युसंख्या दडविली जात असल्याचे वास्तव फडणवीस यांनी आकडेवारीसह मांडले होते आणि दुसऱ्याच दिवशी ते राज्य शासनाला मान्य करावे लागले होते. त्यानंतर सुधारित आकडेवारी देण्यात येऊ लागली. आताही फडणवीस तेच सांगत आहेत. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे कोरोना नियंत्रणाचे मुंबई मॉडेल असे फसवे असेल तर त्याचे कौतुक पंतप्रधानांनी केले असेल का, असा प्रश्न पडतो. शेवटी जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा?

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button