राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही – रावसाहेब दानवे

No one pushed Rahul Gandhi - Raosaheb Danve.jpg

जालना: उत्तरप्रदेशातील (UP News) हाथरस (Hathras case) घटनेने पुन्हा एकदा देश हादरला आहे. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या घटनेचा निषेध केला असून पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल गांधी, प्रियंका गांधी भेटण्यास गेले असता पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाल्याची बातमी समोर आली होती. एवढेच काय तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याच्या बातमीवर संताप व्यक्त केला होता. या प्रकरणावर भाजपाचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले की, राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही.

गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करू शकत नाही. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते.  त्यामुळे कदाचित असं झालं असावं, असे दानवे म्हणाले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “राज्यातील एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवायचा नाही, ही कुठली लोकशाही? जर कोणी आवाज उठवला तर तुम्ही त्याची कॉलर पकडून खाली पाडणार असाल तर हा या देशाच्या स्वातंत्र्यावरचा, इथल्या लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे.

” तर शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.” असे पवार म्हणाले. तर, सर्व माध्यमांनी राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या असताना रावसाहेब दानवे यांनी धक्काबुक्की झालीच नाही, असा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER