काँग्रेसमध्येही राहायला कुणी तयार नाही

Patil-Urmila

badgeजहाज बुडायला लागले की सर्वात आधी उंदरं बाहेर पडतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जहाज बुडते आहे. विधानसभा निवडणूक महिन्यावर आली असताना ह्या दोन्ही पक्षांना लागलेली मेगागळती थांबायला तयार नाही. दररोज कुणी ना कुणी उडी मारून भाजप किंवा शिवसेनेत जातो आहे. एकेकाळी सत्ता गाजवलेल्या ह्या पक्षांमध्ये थांबायला आज कुणीही तयार नाही. जे थांबले आहेत, ते दुसरीकडे जाऊ शकत नाहीत म्हणून नाइलाजास्तव थांबले आहेत.

मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवणारी सिनेनटी उर्मिला मातोंडकर पाच महिन्यातच काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून बाहेर पडली. उर्मिलाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच काँग्रेसचे मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये जात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला नगरची तिकीट शरद पवारांनी नाकारली म्हणून लोकसभेत महाभारत घडले. आता विधानसभेत तेच घडणार आहे. हर्षवर्धन यांना इंदापूरची जागा सोडायला पवार तयार नाहीत म्हणून ‘दुसरा विखे’ जन्माला येतो आहे. काँग्रेस आघाडीचे धिंडवडे निघत असताना पक्षाचे नेते मात्र आपापला राजकीय हिशोब चुकता करण्याच्या मागे लागले आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात धृतराष्ट्र बनून गंमत पाहत आहेत. इंदापूर सोडण्यासाठी पवारांवर दबाव आणायला कुणीही तयार नाही. तिकडे दिल्लीत बसून सोनिया गांधीही काँग्रेसची फजिती पाहत आहेत. का म्हणून लोकांनी आघाडीला मतं द्यायची? तडजोडीचा विचार नाही, पैसे नाहीत, कार्यकर्ते नाहीत, सहकाऱ्यांचे पाय ओढण्याची जुनी सवय मात्र कायम आहे. तुम्ही लिहून ठेवा. आघाडीचा बँडबाजा वाजणार आहे.

इकडे आघाडीत हाणामारी सुरु आहे आणि तिकडे वंचित बहुजन आघाडीतही फटाके लागले आहेत. लोकसभेत पाडापाडी करणाऱ्या वंचित आघाडीतच फुटाफूट सुरु झाली आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील वेगळे झाल्याने राजकारण तापले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी हात वर केले तर प्रकाश आंबेडकरांसाठी तो मोठा धक्का असेल. पण सध्यातरी निवडणूक आंबेडकरांभोवती फिरत आहे. येत्या विधानसभेत वंचित आघाडीकडे विरोधी नेतेपद असेल असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी मागेच केले आहे. आंबेडकरांनी अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. पण यावेळी ते कुणाची मतं खाणार याची चर्चा रंगते आहे. सर्वात भक्कम मोर्चेबंदी युतीची दिसत आहे. जागावाटप ठरायचे असले तरी अजून भाजप-शिवसेना यांच्यातला तणाव बाहेर आलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी लहान भावाची भूमिका घेऊन तलवार म्यान केलेली दिसते. युतीचा घोडा अडवायला कुणीही मजबूत स्पर्धक मैदानात नाही. त्यामुळे युतीने २८८ पैकी २४० जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटू नये. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ताज्या दौऱ्यात दिल्याने फडणवीस यांच्या मार्गावरचे सारे काटे दूर झाले आहेत. युतीच्या ४० टक्के आमदारांची तिकिटे कापलेली दिसतील. आयारामांची सोय लावण्यासाठी मोठी काटछाट होणार आहे.