विशेष पोलीस संरक्षण कोणीही हक्क म्हणून मागू शकत नाही

Nagpur Bench Of Bombay High Court - Police Protection
  • संरक्षण देणे हा विषय सरकारच्या अखत्यारित

नागपूर : आपल्या जिवाला धोका आहे अशी स्वत:ची धारणा आहे म्हणून कोणीही सरकारकडे विशेष पोलीस संरक्षण हक्क म्हणून मागू शकत नाही. कोणाही नागरिकाला विशेष पोलीस संरक्षण द्यायचे की नाही व द्यायचे असल्यास त्याचे स्वरूप काय असावे हे ठरविणे हा पूर्णपणे सरकारच्या अखत्यारितील विषय आहे, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench Of Bombay High Court) म्हटले आहे. भाजपाच्या (BJP) अल्पसंख्य मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल अन्वर स्द्दििकी यांनी आपल्याला ‘एक्स’ दर्जाचे पोलीस संरक्षण मिळावे यासाठी केलेली याचिका फेटाळताना न्या. सुनील शुक्र व न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने हे मत नोंदविले.

आपल्या पदामुळे आपल्या जीवाला नेहमीच धोका संभवतो. हे लक्षात घेऊन आधी आपल्याला ‘एक्स’ दर्जाचे पोलीस संरक्षण दिले गेले होते, परंतु राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार आल्यानंतर ते संरक्षण अचानक काढून घेण्यात आले, असे सिद्दिकी यांचे म्हणणे होते.

सर्व तथ्यांचे अवलोकन करून न्यायालयाने म्हटले की, सरकार एकूणच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व अन्य यंत्रणेची व्यवस्था नेहमी करतच असते. या उप्परही काही व्यक्तींना काही वेळा ठराविक कारणाने याहून विशेष प्रकारची सुरक्षा देण्याची गरज असू शकते. पण अशी गरज आहे की नाही, हे संबंधित व्यक्ती आपल्या मतानुसार ठरवू शकत नाही किंवा स्वत:ला धोका वाटतो म्हणून सरकारकडे हक्क म्हणून विशेष संरक्षण मागू शकत नाही. सरकारने यासाठी निश्चित यंत्रणा उभी केली असून त्याच्या गाईडलाइन्सही आहेत. त्यानुसार विशेष संरक्षणाच्या विनंतीवर विचार करून निर्णय घेतला जातो. स्वत: स्द्दििकी यांना ‘एक्स’ दर्जाची पोलीस सुरक्षा देताना व नंतर ती काढून घेतानाही अशाच पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेण्यात आल्याचे उपलब्ध रेकॉर्डवरून दिसते. त्यामुळे संरक्षण देण्याचा वा काढण्याचा सरकारचा निर्णय मनमानी म्हणता येणार नाही.

न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, विशेष सुरक्षा न देण्याचा किंवा एका ठराविक दर्जाची सुरक्षा देण्याचा सरकारचा निर्णय एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल व त्याला तरीही स्वत:च्या जीवाला धोका आहे, असे वाटत असेल तर ती व्यक्ती स्वत: खर्च करून खासगी सुरक्षेची व्यवस्था करू शकते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER