‘वंचित बहुजन’च्या विरोधात निकाल गेल्यास सोलापुरात भाजपचे एकही कार्यालय शिल्लक राहणार नाही : भीम आर्मीचा इशारा

Bhim Army

सोलापूर: लोकसभा निवडणूकीचा निकाल लागण्यास काही तास उरले असताना चिथावणीखोर विधाने यायला लागली आहे. नुकत्याच भीम आर्मीकडून देण्यात आलेल्या धमकीत म्हटले आहे कि जर या मतदार संघात वंचित बहुजन विकास आघाडीच्या विरुद्ध निकाल गेल्यास भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही. दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली असून या मतदार संघातील निकाल विरोधात गेल्यास भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही.तसेच भाजपच्या नेत्याला फिरू देणार नसल्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. सोलापुरात आंबेडकरांच्या विरोधात डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे निवडणूक लढवत आहेत.

भीम आर्मीच्या या धमकीनंतर प्रकाश आंबेडकर यानी शांतता राखण्याचे आव्हान करत एक व्हिडिओ जारी केला असून यातून हे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी हिंचाचार होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून भीम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नसून कार्यकर्त्यांनी त्याला बळी पडू नये असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या, असे आंबेडकरांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.