नको व्यर्थ चिंता…

Stress

कृष्णाने अर्जुनाला गीतेत दिलेला संदेश आपल्या करता प्रेरणा देत राहणार आहे.”निर्विय तू नको होऊ, न शोभे हे मुळी तुज l भिकार दुबळी वृत्ती सोडूनी उठा तू कसा ll बरेच आयुष्याची वाटचाल करीत असताना काही प्रसंग असे येतात की उगीच चिंता, भीती, हुरहूर वाटते. अतिशय विवेकाने वागणारी व्यक्तीसुद्धा कधीपण चिंतित होऊ शकते, याला कारण आपली च दोन मन. एक झाड दोन पक्षी या बेडेकरांच्या आत्मचरित्रात आणि दया पवारांच्या बलूत या पुस्तकात तटस्थपणे दोन मनातला संवाद संघर्ष रंगवला आहे. एक मन सकारात्मक तर दुसरे मन नकारात्मक असते. ज्यावेळी आपण कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहतो त्यावेळी जर का आपण ठरवून नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायची ठरविले तर हमखास नकारात्मक विचार मनात येत राहतात.

असाच संजय (नावे काल्पनिक) नावाचा एक तरुण. त्याचा स्वतःचा व्यवसाय करतो. व्यवसाय म्हटला की चढ-उतार येतातच. सुरुवातीला अतिशय चांगला चाललेला त्यांचा व्यवसाय मध्यंतरी मंदीची लाट आली आणि त्यात त्यांच्या व्यवसायावर बराच परिणाम झाला. त्यानंतर परत एकदा व्यवसायाने उचल खाल्ली, त्यावेळी तो खूप उंचीवर पोचला. पण परत जसे प्रश्न उद्भवू लागले तसे त्याने काही सपोर्ट उद्योगही सुरू केले. मात्र परत एकदा कोरोना महाराक्षसाने जसा सगळ्यांच्या उद्योगावर परिणाम झाला, तसाच त्याच्याही झाला. व्यवसायात लागणारा कॅश फ्लो चा प्रश्न तसाच आहे. संजय उत्तम प्रकारे प्रयत्नशील असला तरी राहून राहून त्याच्या मनात विचार येत राहतात, मला सारखे अपयश का येते आहे ? माझे प्रयत्न कमी पडतात का ? पुन्हा परत असेच प्रश्न येत राहतील का ?

हे प्रश्न एका संजयचे नाही तर सध्या करियरमध्ये संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याच परिस्थितीतून जावे लागते आहे. असे विचार आपण रोखू म्हटले तरी रोखले जात नाही. उलट काय परिणाम होतो ते सांगणारी एक मजेशीर कथा आहे. एक मनुष्य होता. गेल्या काही वर्षांपासून तो खूप त्रस्त होता. सतत अडचणी, संकट, वेगवेगळ्या समस्या यांचा तो सामना करत आहोत. असंच त्याला वाटत असे. एकदा त्या गावात एक महाराज आले तो एक दिवस त्यांना भेटायला गेला आणि म्हणाला,” महाराज मला काहीतरी मंत्र सांगा. जास्त जप केल्यामुळे माझ्या सगळ्या समस्या दूर होतील. “गुरु महाराजांनी त्याला खूप समजावून सांगितलं की,” काही मंत्र नसतो असा तिच्यामुळे स गळ्या अडचणी दूर होतील “.

पण तो ऐकायला तयार नव्हता. परत म्हणाला,”तुम्ही फार मोठे गुरु आहात. त्यामुळे तुमच्याजवळ असा मंत्र असलाच पाहिजे !”शेवटी गुरुंनी त्याला एक मंत्र सांगितलं सकाळी त्याचा जप केला की सर्व समस्या दूर होतील असे त्यांनी विश्वासाने सांगितले. त्या माणसाला खूप आनंद झाला, गेले कित्येक दिवस तो अशाच साधूच्या शोधात होता. नाचतच बाहेर पडला. इतक्यात गुरूंनी त्याला पुन्हा आवाज दिला, ते म्हणाले,” अरे !एक नियम सांगायचा राहिला. मंत्रजप करताना माकडाची आठवण काढायची नाही. तो म्हणाला,”महाराज! काही चिंता करू नका. गेले अनेक महिने झाले मला कधी माकडाची आठवण आली नाही. दुसरे दिवशी तो सकाळी उठला स्नान करून मंत्र जप सुरू केला ,आणि काय दुर्दैव नेमके फक्त माकडच त्याच्या डोळ्यासमोर नाचायला लागली .खूप प्रयत्न केला पण असे काही विस्मरण होत नव्हते. अनेक दिवस प्रयत्न करत होता पण जपाला बसला की माकडांच्या आठवण हजर ! कंटाळून तो पुन्हा गुरूकडे गेला त्यांना म्हणाला हा नियम तुम्ही सांगितला कशाला ? तुम्ही तर सांगितलं असता तर माकड कधीच आठवले नसते. गुरुमहाराज खळखळून हसले ते म्हणाले, “हा नियम माझा नाही हा आपल्या मनाचा आहे!”

माकडांची आठवण करायची नाही असे ठरवले तर ती होणारच !अनेकदा आपणही असंच दुःख अडचणी समस्या नकारात्मक विचार यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांना विसरण्याचा हि प्रयत्न करतो, पण ती अधिकाधिक माणसाला छळतात असा एखादा मंत्र शोधणे ही एक पळवाट आहे, किंवा यापासून दूर पाण्यासाठी व्यसनाधीन होणे ही सुद्धा एक पळवाट आहे माणूस मन कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतो, तात्पुरते काही यश मिळते. पण ती समस्या परत उसळून वर येतेच. म्हणजे पेन किलर नि वेदना काही काळ दूर होतील पण मुळातला प्रश्न समस्या, रोग मुळातून दूर नाही होत. अशा कुठल्याही मार्गांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तरीही माणसाचे मन विचार आणि स्वभाव तर तोच असतो ना. म्हणूनच अशा वेळी पळून जाण्यापेक्षा समस्यांना तोंड देण्याची गरज असते.

त्या मुळातून समजून घेण्याची गरज असते. बरेचदा आपण ही समस्या आहे असं समजतो, समस्या नसतेच. त्यामागे दडलेली गोष्ट काही वेगळीच असते. उदाहरणार्थ आपण मागच्याच केव्हातरी लेखात बघितल्याप्रमाणे उदाहरण की परीक्षेची चिंता, ही परीक्षेच्या बद्दल मुळात नाहीच. तर विषय न समजणे किंवा, आपल्याकडून आपल्या आई-वडीलांच्या असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकणार नाही. ही भीती त्यांच्या मनात असल्यामुळे परीक्षेबाबतच् भीती वाटू लागते.

आपण समजतो तेवढ्या बरेचदा त्या असतात आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यावर हे कळतं. दुसरी गोष्ट वाट्याला आलेली परिस्थिती स्वीकारण्याची. खरंच या समस्या, अडचणी, प्रश्न, संकट या ऐवजी त्यांना जर आवाहन, चॅलेंजेस अशी नाव दिली तर ती सुसह्य होऊ शकतात. म्हणजे तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो.

दुसरी गोष्ट या समस्यांबाबत विचार करताना परत ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्यांची चिंता करण्यात अर्थ नसतो. म्हणूनच ज्या गोष्टी मी बदलू शकते किंवा शकतो त्या बदलण्याबाबत शक्ती मिळवायची आणि मी बदलू शकत नाही ही समस्या आनंदाने प्रसन्नपणे स्वीकारायची. हे केव्हाही उत्तम !

असाच एक माणूस सगळ्या कटकटींना अडचणींना कंटाळून संन्यास घेण्याकरता संध्याकाळी घराबाहेर पडतो आणि हिमालयाच्या दिशेने चालू लागतो. रात्र होते. अंधार पडतो .गाव मागे पडतं आणि समोर दूर एका वळणावर त्याला अचानक भूत दिसतं. तो घाबरतो, तिथेच थांबतो. काय करावं त्याला कळत नाही आणि परत जाण्याचा निर्णय घेतो आणि चालायला लागतो तितक्यात त्याला भला मोठा साप रस्त्यात आडवा पडलेला दिसतो त्याची भीती वाढते. बरोबरच आहे हो! समोर भूत, मागे साप. आपणही विचारात असेच अडकून बसतो. ही एक काल्पनिक गोष्ट आहे बरेचदा मनुष्य असाच फसत असतो. कोणत्याही मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तरी संकट आणि माहीत नसलेल्या गोष्टींची भीती ही असतेच. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. भुतकाळा बाबतच्या अप्रिय गोष्टी भीती, आणि भविष्यकाळातील चिंता यामध्ये वर्तमान काळ जगायचंच राहून जातो.

फ्रेंड्स ! जर का आपले प्रश्न सोडवायचे असतील तर त्या प्रश्नांना सामोरे जाऊन त्याचे स्वरूप व समजून घ्यायला हवे. मग तो प्रश्न आपण सोडवू शकतो का? की तो आपल्या आटोक्याबाहेरचा आहे हेही विचारात घ्यायला पाहिजे. आणि शक्य असेल तर तो भरपूर प्रयत्नांनी प्रश्न सोडवायचा नाहीतर तर आपल्या मर्यादांचा स्वीकार करून आनंदी व्हायचे. हे आपण करू शकतो. त्याचप्रमाणे वारंवार येणारे विचार अर्थात त्रास दायक विचार दूर लोटण्याचा प्रयत्न करून थांबत नाहीत. त्याला सामोरे जायला पाहिजे.

पण थोडे महत्त्वाचे हे की, याबरोबरच असे
नकारात्मक विचार आपल्याला किती वारंवार येतात ?

किंवा त्याची तीव्रता किती असते?

म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यावर, दररोजच्या या व्यवसायावर प्रयत्नांवर त्याचा परिणाम होतो आहे का ? याचीही चाचपणी आपण करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तज्ञांशी चर्चा करायला पाहिजे. नेहमीच कुठले आजारपण असते असे नाही. बरेचदा स्वतः स्वतःवर काम करून किंवा सायकोथेरपी ची मदत घेऊन समस्या लवकर आटोक्यात येते.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER