शिवसेनेशी आता नाते नाहीच, दगाबाजी तर तुम्हीच केली अमित शहांचा दणका

amit shah - Shivsena

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे (BJP) दिग्गज नेते  अमित शहा (Amit Shah) यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिंधुदुर्गातील  वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणानंतर आता  भाजप शिवसेनेची भविष्यात युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.

यापुढे भाजप व कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाणार नाही उलट शिवसेनेशी दोन हात करण्याची भाजपची भूमिका असेल असे स्पष्ट संकेत शहा यांच्या भाषणाने मिळाले आहेत. त्यामुळे या पुढील काळात शिवसेनेशी युती करून सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील भाजपच्या काही नेत्यांना चाप बसणार आहे.अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द 2019 मध्ये दिला होता असे शिवसेनेकडून अनेकदा सांगितले गेले शहा यांनी असा कोणताही शब्द मी कधीही दिलेला नव्हता असे स्पष्ट केले.

शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गानं चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती”, असे विधान  अमित शहा यांनी या कार्यक्रमात केले. शहा यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेवर सडकून टीका केली ती बघता व आता भाजप कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाणार नाही. उलट स्वबळावर लढण्याची जय्यत तयारी करेल हे स्पष्ट झाले आहे.

“शिवसेनेनं सत्तेच्या लालसेपोटी जनमताचा अनादर करुन साथ सोडली. राज्यातील सध्याचं सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असून याची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात आहेत”, असा खोचक टोला अमित शहा यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वतः नारायण राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“बंद खोलीत नव्हे, मी खुलेआम वचन देतो”

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. “शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो”, असं अमित शहा म्हणाले.

शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचा गड असलेल्या कोकणात आणि ते देखील सिंधुदुर्गात येऊन अमित शहा यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला याचा अर्थ यापुढील काळात दोन्ही पक्षांमध्ये युती तर सोडाच मात्र जोरदार संघर्ष सुरू होईल असे मानले जात आहे.

“नारायण राणे हे अन्यायाविरोधात पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. ते अन्याय होत असेल तर भविष्याचा कोणताही विचार न करता अन्यायाचा प्रतिकार करतात. म्हणूनच त्यांची वाटचाल ही वळणावळणाची राहीली आहे. त्यांचा सन्मान आणि आदर कसा करायचा हे आम्हाला चांगले माहिती आहे असे विधान करुन आम्ही शहा यांनी नारायण राणे यांना भाजपमध्ये महत्त्वाची संधी दिली जाणार असल्याचे संकेत दिले.

या कार्यक्रमात नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला ते म्हणाले की कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER