विरोधकांनी कितीही आरोप केले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार : शरद पवार

Mahavikas Aghadi - Sharad Pawar

कोल्हापूर : सरकार पाडण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू आहेत. हा प्रकार विरोधकांकडून अखंडपणे सुरू आहे. मात्र, हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना भाजकडून हे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

राज्यात काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जातो.

मात्र, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, असे शरद पवार म्हणाले. तसेच, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत होत असला तरी त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नसल्याचा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) वैधतेवर बोलताना आरक्षण टिकण्यासाठी सरकार सर्वोपरी प्रयत्न करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हा खटला लढवण्यासाठी सरकारकडून सर्वेत्तम वकिलांची नियुक्ती केली आहे. येत्या २५ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यात अधिक काही बोलता येत नाही. पण सरकार आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

तसेच शेतकरी कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम असल्याचेही पवार यावेळी म्हणाले . दरम्यान कोरोनावर लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सीरम संस्थेत लागलेल्या आगीवरून संशयाचा धूर निर्माण झाला आहे. परंतु शरद पवार यांनी घातपाताची अशी कोणतीही शक्यता नाही, असे ठाम मत व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER