
मुंबई :- जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात मराठीच्या वापरावरून संघर्षाची ठिणगी पडली. अॅमेझॉनने त्यांच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मनसेची मागणी आहे. मात्र, याविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली! यामुळे मनसे आक्रमक झाली असून ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ही नवी मोहीम मनसेने सुरू केली आहे.
अॅमेझॉनने (Amazon) सत्र न्यायालयात सांगितले की, आम्ही आमच्या अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करू शकत नाही! यानंतर मनसेच्या ‘स्टुडंट विंग’च्या अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला विचारले, अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा नसेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांनी अॅमेझॉनचे अॅप का वापरावे? तसेच, नो मराठी, नो अॅमेझॉन, बॅन अॅमेझॉन असा हॅशटॅग वापरत यानंतर ‘तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी’ असा इशाराही अॅमेझॉनला दिला.
महाराष्ट्रातील मराठी जनता अॅमेझॉनकडून कोट्यवधी रुपयांची खरेदी करते. त्यातून कंपनीला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. अॅमेझॉनचे अॅप वापरायला सोयीचे व्हावे यासाठी त्यांनी आपल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अनेकदा ग्राहकांनीही केली आहे. हीच मागणी मनसेने अॅमेझॉनकडे काही दिवसांपूर्वी लावून धरली होती. सुरुवातीला याबाबत विचार करू असे म्हणणाऱ्या अॅमेझॉनने आता त्याला फाटा देत थेट कोर्टात धाव घेतली आहे. अॅमेझॉनने हे प्रकरण कोर्टात नेल्यानंतर मनसेची वकिलांची टीमही सज्ज झाली आहे. मनसेने ‘तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी’ असा इशारा अॅमेझॉनला इशारा दिला आहे.
मा.सत्र न्यायालयात ॲमेझाॅनचं म्हणणं मराठी भाषा ॲप मध्ये सामिल करू शकत नाही.. मग महाराष्ट्रात मराठी माणसांनी @amazonIN का वापरावं?
मराठी भाषेसाठी #BanAmazon #NoMarathi #NoAmazon— Akhil Chitre (@akhil1485) December 5, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला