विनोद तावडेंबाबत भाष्य करण्याची आता इच्छा नाही : खा. संभाजीराजे भोसले

Sambhajiraje Bhosale-vinod tawde

मुंबई : सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत मदत गोळा केली होती. यावर टीका करताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही असा संताप व्यक्त केला होता. त्यावर तावडे यांनी संभाजीराजे यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे . ती भीक नव्हती तर रस्त्यावरच्या सामान्य माणसांनी प्रेमाने दिलेले पैसे होते. त्यामुळे राजेंनी सामान्यांची अवहेलना केली आहे. अशी खंत तावडेंनी व्यक्त केली होती.

यावर खासदार संभाजी राजे यांनी उत्तर दिले आहे. मी व्यक्त केलेल्या भावना म्हणजे कोल्हापूर, सांगलीकरांच्या भावना आहेत. विनोद तावडेंना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. तावडेंबाबत पुढे भाष्य करण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे .

आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठवली, तर याला भीक का म्हणावे? हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे”, असे ट्विट विनोद तावडे यांनी केले आहे . यावर संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून संभाजीराजे आणि विनोद तावडे यांच्यात आता मतभेद वाढत चालल्याचे दिसत आहे.

दरम्यान महापुरामुळे कोल्हापूर- सांगली येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे .येथील नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत.