लॉकडाउन नाही, कडक निर्बंध होणार; प्रवाशांची विभागणी होणार; वडेट्टीवार यांची घोषणा

Vijay Wadettiwar - Maharastra Today

नागपूर : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. “रोज कोरोनाचे ३५ ते ४० हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला, तरी निर्बंध कडक केले जातील. मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही.” असे वडेट्टीवार म्हणाले.

नागपुरात रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. २५ वर्षांच्या आतील तरुणांना संसर्ग होत आहे. इतकेच नाही, तर लहान मुलांनाही कोरोना होत असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. रुग्णवाढ होत असताना दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, असे वडेट्टीवारांनी नमूद केले आहे.

लॉकडाऊन नाही, पण निर्बंध

“मुंबईत लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल, सोबतच लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध करण्यात येतील. लॉकडाऊन करणे, सामान्य जनतेला परवडणार नाही. रुग्णसंख्या वाढत असली, तरी बेड कसे वाढतील याकडे लक्ष आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान करा, ते श्रेष्ठदान आहे, नागपूरकरांनी नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करा.” असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.

भाजपचा आमदार वाचवण्यासाठी प्रयत्न

“गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश यांची चौकशी लावली आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात केवळ वावड्या उठवल्या जात आहेत. भाजपचे केवळ आमदार वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” असेही वडेट्टीवार म्हणाले.

नियोजन काहीसे चुकलेच

“रुग्ण मोठ्या संख्येने निघत आहेत, तरी ८० टक्के लोकात सिमटन्स नाहीत. आहेत त्या साधनांच्या आधारे परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न आहेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त ६५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. अधिक निधी लागला तरी आम्ही देऊ. नियोजन काहीसे चुकलेच, रुग्ण मोठ्या संख्येने निघतील असे वाटलं नव्हते.” असेही वडेट्टीवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button