‘ना संस्था, ना साखर कारखाना, तरीही आमदार लंकेंनी रुग्णसेवेसाठी उभा केला ‘असा’ पैसा

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके( Nilesh Lanke) यांनी कोरोना रुग्णांसाठी शरदचंद्रजी पवार(Sharadchandraji Pawar) आरोग्य मंदिर नावाचे मोफत कोरोना केंद्र सुरू केलं आहे. जे प्रशासनाला जमलं नाही ते करुन दाखवल्याने त्यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. पारनेरमधील नागरिक आता निलेश लंके यांना देवमाणूस असल्याचे म्हणत आहेत. आमदार निलेश लंके स्वत: या कोविड सेंटरमध्ये (Corona Center)दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, कुठलिही शिक्षण संस्था नाही, की कुठलाही साखर कारखाना नाही, मग आमदार लंके यांनी ११०० बेडचं कोविड सेंटर उभारलं कसं, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सर्वसमावेशक उत्तर दिलं.

निलेश लंके यांनी सांगितलं की, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मी आमदारकीची निवडणूक देखील लोकवर्गणीतून लढवली होती. माझ्याकडं संस्था नाही, किंवा साखर कारखाना नाही, म्हणजे मी काहीच करायचं नाही का? असा प्रतिप्रश्न लंके यांनी केला. मी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा, मदतीचे अनेक हात पुढे आले. दररोज मोठ्या प्रमाणात मदत येत आहे, कुणी रेशन देतंय, कुणी भाजीपाल देतंय तर कुणी रोख स्वरुपात देणगी देत असल्याचं आमदार लंके यांनी बोलताना सांगितलं.

गावातील यात्रेला जसं वर्गणी आणि धान्य गोळा केलं जातं, तसंच इथं होत आहे. राज्यातून, देशातून आणि परदेशातूनही आम्हाला मदतीचा ओघ सुरू आहे. धान्याचा विचार केला तर आतापर्यंत ९-१० ट्रक धान्यआम्हाला मिळालं आहे. भाजीपाला देण्यासाठी रांगा लागतात. विशेष म्हणजे पुढील १-२ महिन्यांसाठी जेवणाच्या पंक्तीसुद्धा बुक झाल्यात. जेवण कुणी द्यायचं, नाष्टा कुणी द्यायचा, ड्राय फ्रूटस् कुणी द्यायचे, फळ कुणी द्यायचं हे आधीच ठरवण्यात आले आहे. एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जसं लोकं मदत करतात. अगदी तशीच मदत मिळत आहे. विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्यात शिर्डी साईबाबांचं देवस्थान आहे. तेथे ज्याप्रमाणे दान दिलं जातं, तसंच दान येथेही मिळत आहे. म्हणूनच, कधी-कधी हे प्रतीशिर्डीच आहे असे म्हणावेसे वाटते, अशा शब्दात कोविड सेंटरला होणारी मदत आणि आर्थिक भार याबद्दल लंके यांनी वस्तूस्थिती सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button