कोरोना; मुंबईत ‘नो गो झोन’; १४६ परिसर सील

मुंबई :- राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आणखी कठोर निरबंध लागू केले आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळलेत त्या भागासह, जवळच्या एकूण १४६ परिसरांना ‘नो गो झोन’ घोषित केले आहे. त्या परिसरात कोणी जाऊ नये असे आवाहन मनपाने केले आहे. दक्षिण मुंबईतील ४८ परिसरांमध्ये कोरोनाचे रुग्ण किंवा संशयित आढळले आहेत. त्यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. वरळीत आठ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी वरळी कोळीवाड्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली. दक्षिण मुंबईत सर्वाधिक १३ रुग्ण प्रभादेवीच्या चाळीत आढळलेट. २४ मार्च रोजी येथील एका खानावळ चालवणाऱ्या महिलेला करोनाची लागण झाल्याचे आढळले होते. तीन दिवसानंतर या महिलेचा मृत्यू झाला.

वरळी कोळीवाड्यातसुमारे ८० हजार लोक राहतात. प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करणं पालिकेला शक्य नाही. कोळीवाड्यात आजपासून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या परिसरात दवाखाने २४ सुरू ठेवण्यात येणार असून एक रुग्णवाहिकाही या परिसरात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पश्चिम उपनगरात कोरोना संशयित असलेले ४६ विभाग निश्चित करण्यात आले आहेत. वांद्रे पश्चिम आणि खारमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याचे आढळले. वांद्रे पूर्वेतील हिल रोड, एसव्ही रोड, २१वा रोड, गव्हर्नंमेंट कॉलनी, गोरेगाव पूर्वेतील बिंबीसार नगर सील करण्यात आले आहेत. अमेरिकेतून आलेली एक २५ वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोमवारी संध्याकाळी हे परिसर सील करण्यात आले आहेत.

पूर्व उपगनरातील ४८ परिसर सील करण्यात आले आहेत. चेंबूर आणि घाटकोपरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. चेंबूर आणि घाटकोपरमध्येच ३५ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. विलगीकरण कक्षासाठी जागा ताब्यात घेणार मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व २४ वॉर्डातील रिकाम्या जागा, इमारती, इमारतीतील फ्लॅट, लॉज, हॉटेल्स, क्लब्स, प्रदर्शन केंद्र, महाविद्यालये, हॉस्टेल्स, जिमखाने शोधून त्यात विलगीकरण कक्ष तयार करण्याचे आदेश दिले आहेत.