रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याचे संकेत

नवी दिल्ली :- लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वेने सेवा पूर्ववत करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, यावर केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम निर्णय झाला नाही, अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने तत्पूर्वी विभागीय रेल्वे बोर्डांना रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याच्या नियोजनाबाबत विचारणा केली आहे. १४ एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक बहाल करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यासही सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला तयारीत राहण्याच्या सूचना मिळाल्याचे रेल्वे विभागांनी सांगितले.

दरम्यान, विभागीय मंडळांकडून सुरुवातीला २५ टक्के सेवा सुरू करून त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती ५० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता असेल तर त्याबाबत रेल्वे मंत्रालयाला सूचित करण्याचे विभागीय मंडळांनी निश्चित केले आहे; पण हे सर्व सरकारच्या लॉकडाऊनबाबतच्या निर्णयावर अवलंबून आहे.

रेल्वेने लॉकडाऊननंतर सर्व सेवा २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. या काळात फक्त ज्या रेल्वेगाड्या त्यांच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहचल्या नव्हत्या त्यांना तिथंपर्यंत पोहचण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.