… तर यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये : नितेश राणेंचा संताप

Uddhav Thackeray-Nitesh Rane

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.यापार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे .

कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. कारण कोकणातील शेतकरी आपले १०० टक्के कर्ज भरतात. त्यांचं कर्ज थकीत राहत नाही. मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय. मग यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये. तसेही माफ होणारच आहे, अशा आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चा होणार आहे.