नो डायट प्लीज

Anvita Phaltankar

कलाकार म्हटलं की अरबट-चरबट खायचं नाही. सतत फिट राहिलं पाहिजे. जराही वजन वाढवायचं नाही. हे सगळं करावं लागतं. शिवाय सेटवर देखील कलाकारांना जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा ते सीनची तयारी करत असतात किंवा त्यांचे संवाद पाठ करत असतात. पण येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेची नायिका अर्थातच आणि अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) ही सेटवर एक वेगळाच वर्कआऊट करत असते आणि ते करत असताना तिला कोणीही डिस्टर्ब करत नाही, उलट तिच्यासमोर अजून तिला आवडीच्या खाण्याच्या डिशेस आणून ठेवल्या जातात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिला डाएट करायला अजिबात परवानगी नाही. इतकेच नव्हे तर तिचं वजन जराही कमी होता कामा नये यासाठी प्रत्येकाचे लक्ष असते. म्हणूनच तिच्या जे जे मनात येतं ते ते खायला तिला सेटवर आणून दिलं जातं. अन्वितासाठी जरी ही मजा असली तरी तिचे सहकलाकार मात्र तिच्यासमोर ठेवलेल्या खाद्यपदार्थांकडे बघूनच स्वतःचे पोट भरून घेतात.

काही दिवसांपूर्वीच ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झाली आहे आणि आणि ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.या मालिकेमध्ये जे कुटुंब दाखवले आहे त्या खानविलकर फॅमिलीचा फिटनेससाठी उत्पादने तयार करण्याच्या बिझनेस असल्यामुळे या घरातील सगळीच मंडळी ही प्रचंड फिटनेसप्रेमी दाखवलेली आहेत. त्यासाठी निवडलेले कलाकारदेखील एकदम स्लीम ट्रीम आहेत. अशा कुटुंबांमध्ये सून म्हणून येणारी अवनी साळवी ही व्यक्तीरेखा वजनाने जाड आहे. हीच या मालिकेची वनलाइन स्टोरी आहे. या मालिकेची नायिका म्हणून वर्णी लागली आहे ती अन्विता फलटणकर हिची. मुळातच ती गोलमटोल आहे. वजनाने जाड आहे. या मालिकेची नायिका असलेली मुलगी जिला आतापर्यंत लग्नासाठी अनेक नकार आलेले आहेत. तिचा स्वभाव , तिच्यातील गुण हे ज्या ओंकारला आवडतात तो तिच्या प्रेमात पडतो. या मालिकेतून हाच संदेश दिला आहे की शरीराची जाडी किंवा शारीरिक आकर्षण न पाहता तुम्ही ती व्यक्ती मनाने किती चांगली आहे हे पाहिले पाहिजे.

अन्विता फलटणकर ही स्वीटू या जाड मुलीची भूमिका करत आहे. नुकतीच मालिका सुरू असल्यामुळे अजून मालिकेतील स्वीटू आणि ओंकारचं प्रेम ,त्यानंतर त्यांचं लग्न आणि मग त्यामुळे खानविलकर कुटुंबांमध्ये घडणारा ड्रामा अशी अजून बरीच लढाई बाकी आहे . त्यामुळे मालिकेतली स्वीटूचं वजन कमी होता कामा नये ही या भूमिकेची गरज आहे. त्यासाठी स्वीटूची भूमिका करणाऱ्या अन्वितासाठी सेटवर रोज वेगवेगळे पदार्थ मागवले जातात. त्यामुळे तिचं वाढलेले वजन मेन्टेन राहील. अनेकदा मालिकेच्या शूटिंगसाठी कलाकारांची धावपळ होते आणि त्यातून कलाकारांची तब्येत कमी होऊ शकते किंवा दगदग चेहऱ्यावर दिसू शकते. नेमका याचाच परिणाम स्वीटूच्या व्यक्तिमत्त्वावर होऊ द्यायचा नाही हा या मालिकेसाठीच्या व्यक्तिरेखेचा पहिला टास्क आहे त्यामुळे या मालिकेच्या सेटवर अन्वितासाठी असे काही पदार्थ रोज मागवले जातात आणि ते तिला खावे लागतात. ज्याच्यामुळे तिचं वजन हे कायम वाढलेले दिसेल. मुळात अन्विताची शरीरयष्टी ही स्थूल आहे. पण तिचा यापूर्वीचा दैनंदिन दिनक्रम आणि सध्या मालिकेचे शूटिंग सुरू असताना होणारी तिची दगदग यामुळे तिचं वजन कमी झाले तर त्याचा परिणाम तिच्या ऑनस्क्रीन स्वीटू या व्यक्तिरेखेवर होऊ शकतो आणि जे या मालिकेच्या निर्मिती टीमला होऊ द्यायचं नाहीय.

अन्विता सांगते, मी प्रचंड खादाड आहे. मला खायला खूप आवडतं. अनेकदा असं व्हायचं की मला अभिनय क्षेत्रात यायचं आहे हे जेव्हा मी बोलून दाखवलं आणि त्यादृष्टीने मी माझे प्रयत्न सुरू केले तेव्हा मला अनेकांनी हे सुचवलं होतं की तू एवढी जाड आहेस आणि तुला त्यामुळे मालिका किंवा अभिनय क्षेत्रात काम मिळणार नाही. पण आतापर्यंत मी जे काम केलं तिथे माझी जाडी कुठेच आडवी आली नाही. उलट मला जाडीमुळेच रोल मिळाले त्याचा मला अभिमान आहे. जेव्हा मला कळलं की येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका जाड मुलीच्या अवती भोवती फिरणारी आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याहीपेक्षा जास्त आनंद मला सेटवर खास माझ्यासाठी काही पदार्थ मागवले जातात जे माझे आवडीचे आहेत आणि ते मला खायचे असतात. भूमिकेसाठी अभ्यास म्हणून खायचं हेच फिलिंग भारी आहे. हे करत असताना माझा सहकारी कलाकार शाल्व माझी खूप चेष्टा करतो. सगळेजण माझा खाण्यामुळे हेवा करतात. कारण मी खात असते आणि सगळेजण फक्त बघू शकतात. त्यांना हे काही खायची परवानगी नाही कारण ते सगळेजण एका फिटनेस उत्पादन बनवणाऱ्या घरातील मेंबर आहेत त्यामुळे त्यांनी फिट दिसले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालिका सुरू असताना देखील मला माझ्या खाण्याची हौस भागवता येते

अन्विता फलटणकर हिने या यापूर्वी गर्ल्स या सिनेमात काम केलं आहे. यूटर्न या वेबसिरीजमध्येदेखील अन्विताचा अभिनय बघायला मिळाला होता. खाण्यावर तिचं खूप प्रेम आहे खाण्यासाठी वाट्टेल ते हा तिचा लाईफ फंडा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER