मंत्री व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याने स्थिती अनिर्णायकी; कोरोनाच्या संसर्गावर फडणवीस कडाडले

Devendra Fadanvis-Uddhav thackeray

मुंबई :- मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मंत्री व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याने सरकारची स्थिती अनिर्णायकी झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्री काय करतात याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नसते. तर मुख्यमंत्री काय सांगतात त्याकडे मंत्र्यांचे लक्ष नसते, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रात उद्भवलेल्या कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करत सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत…

देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी समन्वयातून काम होणे गरजेचे असते. आज डॉक्टर व परिचारिकांना कोरोना संरक्षित पुरेसे ड्रेस नाहीत. त्यांना सकस आहार दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईतील वोकहार्ट रुग्णालय बंद केले जाते. अनेक रुग्णालये परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बंद होत आहेत. खासगी डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेवण्याबाबत सक्ती केली जाते; मात्र त्यांना मास्क अथवा आवश्यक सुरक्षा साहित्य कोण देणार वा कुठे मिळेल तसेच त्यांनी रुग्ण तपासताना कोणती काळजी घ्यायची याची कोणतीही माहिती दिली जात नाही.

जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांशी संबंधित असलेल्या डॉ.  साळुंखे यांची एवढ्या उशिराने का नेमणूक केली, असा सवाल करत कोरोना रुग्णांबाबत ठोस धोरण नसल्याचे फडणवीस म्हणाले. कोरोनाची लढाई आपल्या सर्वांचीच असल्याने आजपर्यंत आम्ही कोणतीही टीका केली नाही. परंतु ठोस निर्णय होणार नसतील तसेच काढलेले आदेश केवळ कागदावर राहात असल्यामुळे लोकांना त्रास होणार असेल तर आम्हाला आवाज उठवावाच लागेल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना केंद्र व राज्य यांनी चर्चा केली पाहिजे. आजची परिस्थिती पाहता मुंबई- पुणे तसेच एमएमआर विभागात अजूनही काही काळ लॉकडाऊन करावा लागेल, असेही ते म्हणाले.

सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; मराठीत अनुवाद

राज्यातील मंत्री रोज नवे शासन आदेश जारी करतात; मात्र या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जाते का हे कोणी तपासायचे, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक शासन आदेश केवळ कागदावरच निघाले आहेत. सध्या मी रोज राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील साडेचार हजार लोकांशी संपर्क साधून माहिती घेत असतो.  तेव्हा अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येतात. प्रामुख्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोरकी झाल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडूनच ऐकायला मिळत आहेत. कोरोनाबाबत ठोस धोरण दिसत नाही. कोणते प्रोटोकॉल सरकारने जाहीर न केल्यामुळे डॉक्टरांमध्येही गोंधळ दिसतो.

खरं तर एवढ्या दिवसांत सरकारवर कोणीही टीका केलेली नाही. विरोधी पक्ष म्हणून आमचीही सहकार्याचीच भूमिका राहिली आहे. अशा वेळी सरकारने पटापट निर्णय घेणे आवश्यक असताना आताही राज्यात अनिर्णायकी स्थिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री वेगवेगळे आदेश काढत आहेत; मात्र त्याची अंमलबजावणीच होताना दिसत नाही.

आरोग्यसेवक व पोलीस हे आज कोरोनाच्या आजाराशी खऱ्या  अर्थाने लढत असताना त्यांचा पगार का कापण्यात आला, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, देशातील कोणत्याच राज्याने पोलीस व आरोग्यसेवकांचा पगार कापलेला नाही. मंत्री व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याने उच्चपदस्थ अधिकारीही भांडत असल्यासारखे वागत आहेत. काही अधिकारी ही संधी साधून आपला हिशेब चुकवू पाहात आहेत, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने पुरेसे धान्य पाठवूनही आज रेशन दुकानात लोकांना धान्य मिळत नाही. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत केशरी शिधापत्रिका असलेल्यांना धान्य देण्याचा निर्णय घेतला. आज राज्यात लाखो  स्थलांतरित आहेत, ज्यांच्याकडे कोणतीच शिधापत्रिका नाही. अशांनाही खरे तर रेशन दुकानात धान्य दिले पाहिजे. १६ राज्यांत आज शिधापत्रिका नसली तरी धान्य दिले जात आहे. आपल्यापेक्षा छोटी राज्येही आज कोरोनाच्या लढाईत रेशन दुकानावर सर्वांना धान्य देण्याचा निर्णय घेतात आणि केंद्राने पुरेसे धान्य दिलेले असतानाही आज रेशनवर धान्य मिळत नाही. स्थलांतरितांनाही रेशनवर धान्य दिले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले. कोरोनाच्या लढाईत काही मंत्री केवळ केंद्रावर टीका करून प्रसिद्धी घेण्याचे काम करत आहेत. सरकार रोजच्या रोज आदेश काढण्याचे काम करत असले तरी जमिनीवर कृती काय होते ते महत्त्वाचे  असल्याचा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

राज्यात सर्वाधिक उद्योग असताना आपण उद्योगांना हाताशी धरून कोरोना संरक्षित ड्रेस, मास्क तसेच आवश्यक गोष्टी का करू शकत नाही, असा सवाल करताना वोकहार्टसारखी अन्य हॉस्पिटल्स बाधित झाली तर उद्या आपली स्थिती इटालीसारखी होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. एवढ्या उशिराने म्हणजे हजाराहून अधिक कोरोनाबाधित लोक झाल्यानंतर जागे झालेल्या सरकारने कोरोना सल्लागार म्हणून माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांची आज नेमणूक केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


Web Title : Devendra Fadnavis : Lack of coordination between Ministers and CM

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)