मनमानी नको, नाही तर पुणेकर आहेतच….

Shailendra Paranjape१ जूनपासून अनलॉकपर्व सुरू करून शहर, दैनंदिन जीवन पुन्हा सामान्य व सुरळीत होत असतानाच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. तो घेतानाच त्यांनी आणि त्यांच्या सरकारनं २४ तासांत पुण्याच्या शहर आयुक्तांची उचलबांगडी केलीय. काल या विषयावर लिहिताना आम्ही हा लॉकडाऊनचा निर्णय पूर्णपणे कोरोना परिस्थितीमुळं आहे की अन्य कारणं आहेत, अशी शंका उपस्थित केली होती. ती खरी असावी की काय, असं म्हणायला नक्कीच वाव आहे.

एक तर पुण्याच्या पालिकेत भारतीय जनता पक्षाचं एकहाती बहुमत आहे. त्यात पुण्याचे आठपैकी सहा आमदार भाजपचे आहेत आणि पुण्याची लोकसभा जागाही भाजपच्या गिरीश बापट यांनी जिंकलीय. त्यामुळं काल अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याचा आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज खासदार गिरीश बापट यांनी त्याविरुद्ध आवाज उठवलाय.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं कारभार करतात आणि निर्णय घेतात, अशी टीका बापट यांनी केलीय. वास्तविक, एप्रिल महिन्यात संपूर्ण लॉकडाऊनच्या पहिल्या पर्वात पालकमंत्र्यांना पुण्यात यायला वेळ झाला नव्हता आणि त्यामुळं संपूर्ण महिनाभरात त्यांनी एक-दोन बैठका घेतल्या आणि त्यातही पुण्यातही बारामती पॅटर्न राबवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. आता मुळात बारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्यात आला होता; पण दुसऱ्याचं केलेलं काम आपल्या नावावर सांगण्याचं कौशल्य दाखवत त्यालाच बारामती पॅटर्न असं सरकारी प्रसिद्धिपत्रकांमधूनही सागितलं जाऊ लागलं. पण आता पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. तेव्हा मात्र भाग्यविधात्यांनी दाखवलेला बारामती पॅटर्नचा उल्लेख गायब झालाय.

अजित पवार डायनामिक आहेत, धडाडीने निर्णय घेतात; पण त्यामुळंच पहिला महिनाभर पुण्याला त्यांनी वाऱ्यावर सोडल्यानंच आजची स्थिती निर्माण झालीय आणि त्यांनी अचानक एंट्री घेऊन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लॉकडाऊन पुण्यावर लादलाय, का अशी चर्चा सुरू झालीय. पुन्हा लॉकडाऊन म्हटल्यावर शनिवारी पुण्याच्या सर्व भागांत दुकानांच्या बाहेर, भाजीवाल्यांकडे रांगाच रांगा बघायला मिळाल्या. आता या गर्दीमुळं कोरोना वाढत नाही का… कोरोना वाढला की त्याचा दोष नागरिकांच्या बेजबाबदार वागण्याला द्यायचा आणि रुग्णांचं प्रमाण कमी झालं की, त्याचं श्रेय आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळं, असं म्हणत आपापल्या पॅटर्नचे ढोल वाजवायचे, यात कसलं आलंय पुढारपण किंवा नेतृत्व…

खरे नेते दिशा दाखवतात, कसोटीच्या प्रसंगी गडबडून न जाता ठाम निर्णय घेतात. लोकापवादाची पर्वा न करता समाजाला योग्य दिशेनं नेणारे निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम दिसले की, त्यांचं नेतृत्वही सिद्ध होतं. पण इथं कोरोना काळात स्वतःच घाबरून गायब व्हायचं आणि अचानक जागं होऊन विकेंद्रित पद्धतीनं निर्णय न घेता किंवा लोकशाही पद्धतीनं सर्वांना विश्वासात न घेता निर्णय घ्यायचे, असं केलं तर पुण्यात तरी ते खपवून घेतलं जात नाही, हा इतिहास आहे.

काल आणि आजवरून पुढे जायचं असतं. मनमानीमुळंच तर पुण्यात राजकीय अपयशाला सामोरे जावे लागलेले किमान अशा संकटाच्या काळात तरी मनमानी करणार नाहीत आणि लोकशाही पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन आपण भाग्यविधाते नाही तर केवळ कारभारी आहोत, हे लक्षात घेतील, तेव्हाच खरं… नाही तर पुणेकर वेळ येते तेव्हा पुणेरीपण दाखवायला तयार आहेतच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER