शर्जील उस्मानीवर १५ मार्चपर्यंत सक्तीची कारवाई करणार नाही

CM Uddhav Thackeray - Bombay High Court - Sharjeel Usmani
  • राज्य सरकारचे हायकोर्टास अभिवचन

मुंबई : गेल्या ३० जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत (Elgar Parishad) प्रक्षोभक भाषण करून समाजाच्या दोन वर्गांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (Aligarh Muslim University) विद्यार्थी संघटनेचे माजी नेते शर्जील उस्मानी (Sharjeel Usmani) यांच्याविरुद्ध येत्या १५ मार्चपर्यंत सक्तीची कारवाई करण्यात येणार नाही, असे तोंडी आश्वासन राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिले.

‘भाजयुमो’च्या नेत्याने केलेल्या फिर्यादीवरून पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलिसांनी उस्मानी यांच्यावर भादंवि कलम १५३ ए अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तो रद्द करण्यासाठी उस्मानी यांनी केलेली याचिका न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे आली होती. परंतु मूळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी त्यांना अद्याप ‘एफआयआर’ची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले. न्यायालयाने त्या मूळ फिर्यादीस याचिकेत प्रतिवादी करण्यास सांगून सुनावमी १५ मार्च रोजी ठेवली.

उस्मानी यांना पोलिसांनी उद्याच (बुधवारी) जाबजबाबांसाठी बोलावले आहे. सुनावणी तहकूब करता असाल तर तोपर्यंत तात्पुरते संरक्षण द्यावे, अशी विनंती उस्मानी यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी केली. त्यावर न्यायाधीशांनी विचारले असता अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर जे. पी. याज्ञिक यांनी १५ मार्चपर्यंत उस्मानी यांच्यावर सक्तीची कारवाई करण्यायत येणार नाही, असे तोंडी सांगितले. ‘तुम्हीही पोलिसांना तपासात सहकार्य द्या’, असे न्यायाधीशांनी उस्मानी यांनाही सांगितले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER