दूध भेसळीबाबत कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही: मंत्री पाटील-यड्रावकर

सांगली :- राज्यात मोठ्या प्रमाणावर दुधामध्ये भेसळ होत असल्याची कबुली खुद्द अन्न पुरवठा तसेच वैद्यकिय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी शनिवारी सांगलीत दिली आहे. भेसळ करणार्‍यांवर कारवाई केली नाही तर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या राज्यात मराठी शाळां च्या झालेल्या दुरावस्थेला शासन यंत्रणेलाच जबाबदार धरतांना मंत्री पाटील यांनी सध्या बंद पडत चाललेल्या यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत यंत्रमाग उद्योगांना उर्जितावस्था देण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

सांगलीतील लठ्ठेलठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये भेसळ होत आहे, दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जर दुधात भेसळ थांबली नाही आणि कारवाई दिसली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.