महाराष्ट्रात अशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणार नाही: नीलेश राणे

Nilesh Rane-Ashok Chavan

मुंबई :- छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाला मोठा पराभव सहन करावा लागला. मात्र या राज्यांमध्ये काँग्रेसला भरभरून मते मिळाली असली तरीही महाराष्ट्रात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्याचे कारण म्हणजे अशोक चव्हाण असे पर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही’, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर नीलेश राणे यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि नारायण राणेंमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करून काँग्रेसने नारायण राणे यांना नाराज केले होते . यामागे अशोक चव्हाणांचा हात असल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला होता. अशोक चव्हाण हे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पात्र नसून त्यांनी पक्षाच्या हिताचे निर्णय घेतले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावर करत काँग्रेसला रामराम टोकले होते .

छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याने काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे . याच पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशात काँग्रेस जोरात आहे. पण महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये शिवसेना, धुळेमध्ये भाजपा, नांदेड (लोहा) नगर पंचायतमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यश मिळविण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना अपयश आले . याच अंदाजानुसार काँग्रेसला देशात दिवस चांगले आलेत पण महाराष्ट्रात अच्छे दिन येणार नाही’, असे ट्विट करत लिहिले आहे .