निवेदिता सराफ यांना हवी आहे मदत

Nivedita Saraf

सध्या ‘अग्गोबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी मुंबई महापालिकेकडे एक वेगळीच मदत मागितली आहे. ही मदत कुठल्याही कलाकारांच्या मदतीसाठी नसून ती भारतीय हस्तकला टिकवण्याच्या दृष्टीने मागितली आहे. आणि त्यासाठी निवेदिता सराफ यांनी महापालिकेला एक प्रस्तावदेखील दिला आहे. काय आहे ही मदत? निवेदिता सराफ अभिनयासोबत स्वतः साडी डिझायनिंगचा व्यवसायदेखील करतात. त्यांना हा व्यवसाय करत असताना असे लक्षात आले की हस्तकलेतून तयार होणाऱ्या साडीची कला हळूहळू लोप पावत चालली आहे; कारण अशा प्रकारची कला ज्यांच्या हातात आहे असे कलाकार कमी होत चालले आहेत आणि त्यामुळे ही कला कुठे तरी मागे पडत आहे. यासाठीच हस्तकलेतून बनवणाऱ्या साड्या टिकाव्यात म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी निवेदिता सराफ यांना पालिकेकडून सवलतीच्या दरामध्ये जागा हवी आहे. त्यांनी केलेल्या या आवाहनाची सध्या त्यांच्या सोशल मीडिया पेजवरदेखील जोरात चर्चा सुरू आहे. कलाकार म्हणून लोप पावत चाललेल्या कला वाचल्या पाहिजे या भावनेतून निवेदिता सराफ यांनी हे इनिशिएटिव्ह हातात घेतले आहे.

बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर निवेदिता सराफ यांनी छोट्या पडद्यावर ‘अग्गोबाई सासूबाई’ या मालिकेच्या माध्यमातून पदार्पण केलं.

आयुष्यामध्ये कमी वयामध्ये वैधव्य आल्यानंतर मुलांना सांभाळण्यासाठी ज्या स्त्रिया आपल्या सगळ्या हौसमौजेला मुरड घालतात त्यांनादेखील नव्याने आयुष्य सुरू करण्याचा अधिकार आहे, असा संदेश देणार्‍या या मालिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ यांचा चाहता वर्ग वाढला. एकीकडे अभिनय क्षेत्रात पुनर्पदार्पण दणक्यात झाले असतानाच निवेदिता सराफ यांचा साडी डिझायनिंगचा व्यवसायदेखील त्या सांभाळत आहेत.

एका मुलाखतीदरम्यान त्यांना विचारण्यात आले की, नव्या वर्षाचा त्यांचा संकल्प काय आहे ? याविषयीच त्या बोलत होत्या. आपल्या हातमाग किंवा हस्तकलेच्या माध्यमातून साडी तयार करण्याची कला टिकून ठेवण्यासाठी त्यांना काही तरी करायचे आहे, असे त्यांनी बोलून दाखवले. निवेदिता सांगतात की, सध्या मशीनवरच्या प्रिंट साड्यांची जोरदार चलती आहे. अशा साड्या एका दिवसामध्ये मोठ्या संख्येने तयार होतात हे जरी खरं असलं तरी ज्या साड्या हातमागावर तयार होतात त्या साड्या तयार करण्यासाठी हस्तकौशल्य लागतं. अशा साड्या बनवणारे कलाकार कमी होत आहेत याला बरीच कारणं आहेत. अशा साड्या एका दिवसामध्ये तयार होत नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी जास्त वेळ खर्च करावा लागतो आणि त्या प्रमाणात अशा कलाकारांना योग्य मोबदला मिळत नाही. पण जर भविष्यात हातमागाच्या साड्यांचे प्रॉडक्शन वाढले तर या साड्या बनवणाऱ्या कलाकारांना चांगले दिवस येतील त्यासाठी आमच्याकडे काही असे प्रशिक्षक तयार आहेत जे हातमागाच्या साड्या कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण देऊ शकतात. या प्रशिक्षणातून जर कलाकार तयार झाले तर मोठ्या प्रमाणात हस्तकलेतून किंवा हातमागातून तयार होणाऱ्या साड्यांचे कलेक्शन वाढेल आणि त्यातून ही भारतीय कला टिकली जाईल. त्यासाठी महापालिकेच्यावतीने काही जागा किंवा शाळांचे हॉल उपलब्ध करून दिले तर त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. आज अनेक महिला रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. अशांना एकत्रित करून जर त्यांना साड्या बनवण्याचे प्रशिक्षण मिळाले तर त्या स्वतंत्र व्यवसायदेखील करू शकतील. त्यामुळे एक नवी संधी महिलांना तसेच अशा कलांमध्ये रस असणाऱ्या कलाकारांना मिळू शकते. यासाठीच मला महापालिकेचे सहकार्य हवे आहे. निवेदिता सराफ यांचा हा दृष्टिकोन खरंच खूप चांगला आहे. एखादा कलाकारच एखाद्या कलाकाराचे दुःख समजू शकतो या भावनेतून निवेदिता सराफ यांनी हा नव्या वर्षाचा संकल्प केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून त्यांना जर जागा उपलब्ध झाली तर लवकरच भविष्यात निवेदिता सराफ एक अभिनेत्री म्हणून, एक साडी डिझायनर म्हणून तर प्रसिद्ध आहेतच; पण अनेक गरजू महिलांना आणि गरजू कलाकारांना काम देणारा मार्ग बनू शकतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER