राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडूंची पाठिंब्याची नौटंकी; निवेदिता दिघडेंचा टोमणा

Nivedita Dighade - Bacchu Kadu

अमरावती : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) हे शेतकऱ्यांना घेऊन दुचाकी व चारचाकी वाहनाने दिल्लीकडे निघाले आहेत. यावर भाजपाच्या (BJP) जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे (BJP Leader Nivedita Dighade) यांनी कडूंना टोमणा मारला, राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडूंची पाठिंब्याची नौटंकी सुरू आहे.

बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून गुरुकुंज मोझरी येथे आज (रविवारी) निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपाचे कार्यकर्ते उद्या बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात आंदोलन करणार आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवत आहेत. सत्तेत आल्यापासून महाराष्ट्र सरकाराने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात येणार होती; मिळाली नाही. दूध दरवाढ देण्यात आली नाही. पावसामुळे विदर्भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. तुटपुंजी रक्कम मिळाली. अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू शेतकऱ्याना पाठिंबा देण्याची नौटंकी करत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दोन हजार शेतकरी मोटरसायकलने व चारचाकी वाहनाने अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीला रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER