नीतीश कुमार यांची डोकेदुखी वाढली; उमेदवारी न मिळालेले भाजप नेते पासवानांच्या गोटात

nitesh Kumar

पाटणा : केंद्रीय रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitesh Kumar) यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच वेळी देशपातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी घेतली आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि संयुक्त जनता दलाकडून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्यानंतर आता नीतीश कुमार यांच्यासमोर नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे.

भाजप-जदयु यांच्यात युती झाल्यामुळे उमेदवारी कापली गेलेले भाजप नेते चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात (लोजप) दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या १० बड्या नेत्यांनी लोजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये दोन विद्यमान आमदारांचा समावेश आहे. तर आता भाजपमधील अनेक नेते एलजेपीमध्ये प्रवेशासाठी रांग लावू लागले आहेत. यातील अनेकांचे मतदारसंघ जागावाटपात जेडीयूकडे गेले आहेत. यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याचीच चर्चा सुरू झाली आहे. भाजप-जदयु यांच्यात युती झाल्यानंतर या दोन्ही आमदारांचे मतदारसंघ जदयुच्या वाट्याला आले. त्यामुळे या भाजप नेत्यांनी ‘लोजप’मध्ये प्रवेश करून नीतीश कुमार यांच्याविरोधात शड्डू ठोकायचे ठरवले आहे. ‘लोजप’कडून केवळ ‘जदयु’विरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार आहेत.

लवकरच लोजपकडून ७० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पालीगंज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार उषा विद्यार्थी यांनी बुधवारीच लोजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, राजेंद्र सिंह आणि रामेश्वर चौरासिया यांनीही निवडणूक लढवण्यासाठी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. या तिन्ही नेत्यांना अनुक्रमे पालीगंज, दिनारा आणि सासाराम मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने या तिन्ही नेत्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिघांनीही पक्षाचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आता नीतीश कुमार यांच्या ‘जदयु’समोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, नीतीश यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने चिराग पासवान यांना स्वबळाची चूल मांडण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अनेक भाजप नेते एलजेपीमध्ये प्रवेशासाठी गर्दी करू लागले आहेत. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात एनडीएकडे गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहात आहे. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नाही. नीतीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. याच वेळी भाजपकडून जेडीयूच्या विरोधात राजकारण सुरू आहे. चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढणार असून, ते जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे ते प्रामुख्याने जेडीयूची मते खातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER