नीतीश कुमार यांचं सरकार संकटात? जदयुचे १७ आमदार राजदच्या संपर्कात

nitish kumar

पाटणा : नुकत्याच बिहारमध्ये निवडणुका होऊन मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र, पडद्याआड राजकीय घडामोडी सुरूच आहेत. त्यातच आता नीतीश कुमार यांचं सरकार त्यांच्याच पक्षातील १७ आमदार पाडू इच्छित आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट राजदच्या नेत्याने केला आहे. हे १७ आमदार भाजपावर नाराज असून, राष्ट्रीय जनता दलाच्या वाटेवर आहेत आणि लवकरच पक्षात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट या नेत्यानं केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

जदयुचे आमदार भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. भाजपामुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत; पण त्यांना तूर्तास  थांबवण्यात आलं आहे, असं रजक यांनी म्हटलं आहे. या नाराज आमदारांना आताच पक्षात प्रवेश दिला तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व आपोआप रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे २५ ते २६ आमदार एकाच वेळी जदयुतून बाहेर पडून राजदमध्ये आले, तर त्यांचं सदस्यत्व कायम राहील, असंही रजक म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपाने एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आणि बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जदयुचे सहा आमदार फोडले. त्यामुळे जदयुमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

नीतीश कुमार यांनीही  नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळेच १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. नीतीश कुमार यांच्यासमोर अडचणी वाढत आहेत. ज्या प्रकारे भाजपाने अरुणाचलमध्ये जदयुचे सहा आमदार फोडले त्यावरून स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे भाजपा नीतीश कुमार यांना कमकुवत करण्याचा डाव आखत आहे. बिहारमध्ये भाजपाची जी कार्यपद्धती आहे, त्यामुळेही आमदार त्रस्त झाले आहेत. भाजपाने आपले वर्चस्व गाजवू नये, अशी १७ आमदारांची इच्छा आहे, असं रजक यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER