नीतीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार; सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार, उद्या शपथविधी

Nitish Kumar

पाटणा : संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नीतीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. नीतीश यांच्या मंत्रिमंडळात याआधी काम केलेल्या अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता नीतीश कुमार (Nitish Kumar) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. ते सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नीतीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नीतीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रिपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नीतीश कुमारच मुख्यमंत्री होतील असे स्पष्ट केले असताना नीतीश कुमार यांनी मात्र मौन बाळगले होते. यासोबतच आपण मुख्यमंत्रिपदावा दावा केला नसल्याचंही म्हटलं होतं. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नीतीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER