नितिशला लागली वेगळी चुटपुट

नितिशला लागली वेगळी चुटपुट

कलाकार ही नेहमी त्यांच्या चाहत्यांना आणि रसिकांना मायबाप असं म्हणत असतात. कारण रसिकांच्या प्रेमामुळे त्यांच्या अभिनयाला दाद मिळत असते. त्यांमध्ये असे अनेक चाहते असतात, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं असतात. कलाकारांनी आपल्यासोबत एकदा बोलावं ,एकदा भेटावं असं वाटतं असतं. कलाकारांनाही त्यांची ही इच्छा पूर्ण करायची असते पण अनेकदा कामाच्या व्यापातून या गोष्टी राहून जातात. अनेक कलाकारांच्या बाबतीत अगदी सहज घडणारी गोष्ट आहे. लागिर झालं जी या मालिकेचा नायक, फौजी ही भूमिका साकारणारा नितीश चव्हाण याच्या आयुष्यात मात्र एका चाहतीला भेटायचं राहून गेल्याचं दुःख सलत आहे आणि त्याचं कारणही तितकंच भावनिक आहेत. त्यामुळे तिला न भेटल्याची चुटपुट नितिशला लागून राहिली आहे.

लागीर झालं या मालिकेमध्ये फौजी ची भूमिका नितीशने साकारली होती. नीतीशवर अनेक मुली फिदा तर होत्याच पण त्याच्या चाहत्यांमधील अनेक महिलांना देखील तो खूप आवडायचा. खरंतर ही मालिका ऑफएअर होऊन बरेच दिवस झालेत मात्र अजूनही त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. ही मालिका जेव्हा सुरू होती तेव्हापासूनच प्रियांका नावाच्या एका मुलीचा नितीशला निरोप मिळाला की ती त्याची प्रचंड फैन असून एकदा तिला त्याला भेटायचं आहे. नितीशलाही वाटायचं की खरंच तिला भेटावं परंतु शूटिंगच्या व्यापातून नितीशला तिला भेटणं काही शक्य झालं नाही. दरम्यान लागिर झालं जी मालिका संपली. तो त्याच्या इतर कामांमध्ये व्यस्त झाला परंतु प्रियांकाच्या मनातून मात्र नीतीशला भेटण्याची इच्छा काही जात नव्हती.

नीतीश सांगतो, खूपदा चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आमच्यापर्यंत त्यांची भेटण्याची इच्छा पोहोचवतात. कधीकधी आमच्या टीम मधला, युनिट मधलं त्यांच्या कोणीतरी ओळखीचं असतं. त्यांच्याकडूनही आम्हाला बरेचदा असे निरोप देतात. खरंतर आम्हाला त्यांना भेटण्याची खूप इच्छा असते परंतु तो योग काही जुळून येत नाही. प्रियंकाच्या बाबतीतही असंच झालं. तिला मला भेटायचं होतं हे मला माहीत होतं पण काही ना काही कारणाने ते राहून जात होतं. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी मला एक अतिशय दुःखद बातमी बातमी कळली. ज्यांच्याकडून प्रियांकाने भेटण्याचा निरोप पाठवला होता त्या व्यक्तीला मी लगेच फोन केला आणि प्रियंकाच्या निधनाचं कारण विचारलं . जितके दुःख मला प्रियांकाला मी का भेटलो नाही या गोष्टीचे झाले, तितकच, ती कशामुळे या जगातून गेली हे ऐकून देखील मला तितकच वाईट वाटलं. खरंच मी प्रियंकाची इच्छा पूर्ण करू शकलो असतो तर आज तीची मला भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात तरी या जगातून गेली असती असे मला राहून राहून वाटतं. प्रियांकाच्या हृदयाला एक छिद्र होतं आणि त्यामुळेच तिच्या आयुष्याचा शेवट झाला हे जेव्हा मला कळलं तेव्हा खरंच तिची किती मनापासून इच्छा होती मला भेटण्याची, पण परिस्थितीमुळे असेल किंवा काही बिझी शेड्युलमुळे असेल माझ्याकडून प्रियांकाला भेट देण्याची इच्छा राहून गेली. ही सय मला कायम आयुष्यभर राहील.

नीतीशने स्वतःचा अनुभव सोशल मीडिया पेज वर शेअर केला आहे. पण त्याने जाता जाता त्याच्या सारख्या अनेक कलाकारांना हे सांगितले आहे की, जर खरंच एखादा तुमचा चाहता मनापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत असेल, वारंवार तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या बिझी दिनक्रमातून थोडावेळ त्या चाहत्यांसाठी नक्की काढा. कारण अनेकदा चाहते काही आजाराची झुंज देत असतात, कधी कधी त्यांचे आयुष्य देखील खूप कमी उरलेल असतं ही गोष्ट आपल्याला माहित नसते. त्यामुळे एक कलाकार म्हणून आपल्याशी त्यांची एक वेगळी बांधिलकी असते आणि केवळ चाहत्यांच्या टाळ्या किंवा रसिकांची वाहवा यापलीकडे सुद्धा आपण काही वेळापुरता भेटल्यामुळे जर त्या चाहत्यांना आनंद मिळणार असेल आणि त्यांच्या आयुष्याचा एक कोपरा आपण समाधानी करणार असू तर कलाकारांनी या गोष्टीचा नक्की विचार करावा.

आजच्या मालिका मधील कलाकार घराघरात लोकप्रिय होत असतात. शिवाय मालिकांचे शुटींग देखील आता केवळ मुंबईतच होत नाही तर अनेकदा गावागावांमध्ये मालिकेची शूटिंग होत असतात. त्यामुळे गावातील चाहते कलाकारांना भेटण्यासाठी फार उत्सुक असतात. अशा वेळेला संबंधित मालिकेच्या युनिट प्रमुखाने देखील कलाकारांना अशी परवानगी दिली पाहिजे. तिथे थोडा वेळ का असेना, आपल्या चाहत्यांना भेटता येईल. या अनुभवाने खरंच कलाकारांना एक वेगळा विचार करण्याची किल्ली दिली आहे की तुम्ही नक्की तुमच्या चाहत्यांना भेटा आणि त्यांच्याशी बोला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER