शरद पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व; नितीन राऊतांचे प्रत्युत्तर

nitin-raut-reaction-on-sharad-pawar-statement

मुंबई : चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. चीनने घुसखोरी केली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवार यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी आमच्या पक्षाचे नेते आहेत, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आमच्या पक्षातील अनेकांनी बलिदान दिलं आहे.

ही बातमी पण वाचा:- संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार – ऊर्जामंत्री नितीन राऊत

चीनबाबत राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले ते पंतप्रधानांबाबत उपस्थित केले होते, त्यांनी राजकारण केलं नाही. चीनने घुसखोरी केली नाही, असं विधान पंतप्रधानांनी केलं होतं. त्याबाबत राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवार आमचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे नेते आहेत, यूपीएचे प्रमुख घटकपक्ष आहेत. राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवारसाहेबांनी विसरायला नको की, १९६२च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्त्रसज्ज होत होता. शरद पवारांचे यशवंतराव चव्हाण हे संरक्षणमंत्री होते, इंदिराजींनी १९७१चं युद्ध जिंकलं होतं हे पण पवारांना आठवलं असतं तर बरं झालं असतं. पुढे ते म्हणाले की, शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षणमंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर योग्य झालं असतं.

पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकीची भावना आहे. पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी चर्चा केली असती तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लक्षात आला असता. पवार यांनी मोदींना प्रसारमाध्यमांना सामोरं जाऊन वस्तुस्थिती देशासमोर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे. संवादात कुठे तरी चूक झाली आहे. राहुल गांधी हे देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बोलले आहेत. सीमेवर काय घडलं हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. शरद पवारांनी पंतप्रधानांना सांगायला हवं होतं की, प्रसारमाध्यमांसमोर समोर येऊन मन की बात सांगण्याऐवजी याबाबत जन की बात सांगायला हवी, असं ही राऊतांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER