१०० युनिट वीज बिल माफ करू असं म्हटलंच नव्हतं : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Nitin Raut

नागपूर :- १०० युनिट वीज बिल माफ करू असं आपण म्हटलंच नव्हतं, असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला. १०० युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती नेमण्यात आली, असं आपण सांगितलं होतं. पण कोरोनाच्या (Corona) संकटामुळे त्या समितीची बैठक झालीच नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असंही ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटलं. ते आज नागपुरात (Nagpur) माध्यमांशी बोलत होते. विजेचे चालू बिल न भरणाऱ्या ग्राहकांना १५ दिवसांची नोटीस देऊन वीज खंडित केली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे सरकार वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना शॉक देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर केला नसतानाही मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावरून वीज बिल भरू नका, असं आवाहन विरोधकांकडून करण्यात आलं आहे. वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आणि भाजपनं आंदोलनही केलं आहे. असं असलं तरी वीज बिल भरावंच लागेल, असं ऊर्जामंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

तर महावितरण (MSEDCL) जगणार कशी?

महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) शपथविधी शेतकऱ्यांच्या साक्षीनं झाला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपचं वीज बिल आंदोलन फसवं आहे. इंधन दरवाढ, धान्य दरवाढ होत आहे. अशा वेळी १० महिने वीज बिल भरलं नाही तर महावितरण जगणार कशी? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. वीजनिर्मितीसाठी पैसे लागतात. त्यामुळे जनतेनं वीज बिल भरावं. तुमचं वीज बिल भरणं म्हणजे महावितरणसाठी जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याचंही राऊत म्हणाले.

माझ्या घरी लग्न, नियमांचं पालन करणार

थकबाकीदार बनवण्याचं काम भाजपनं केलं. केंद्र सरकार खासगी कंपन्यांसाठी महावितरणला संकटात टाकण्याच्या तयारीत आहे. सरकारी कंपनी ही सरकारी असते. त्यात ग्राहकांना सवलती मिळतात. मात्र, खासगीकरणाचा घाट केंद्र सरकार घालत असल्याचा आरोप ऊर्जामंत्र्यांनी केला. तसंच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. नियमांचं पालन योग्य केलं तर चिंता करण्याची गरज नाही. माझ्या घरी लग्न आहे. त्यात मी नियमांचं पालन करणार असल्याचंही राऊत यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच माझ्यावर शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची पाळी येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी आपण राज्यातील जनतेला १०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अद्यापही ठाम असल्याचं वक्तव्य २० नोव्हेंबर २०२० रोजी केलं होतं. त्यावेळी आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करू, मगच १०० युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER