पंचांमध्ये प्रशंसा मिळवायचा अपवाद ठरलेले नितीन मेनन

Nitin Menon

क्रिकेटमध्ये पंचांच्या वाट्याला कौतुक फारच कमी येते. ते चर्चेत येतात ते चुकीच्या किंवा वादग्रस्त ठरलेल्या निर्णयांमुळेच आणि टीकेचे लक्ष्य ठरतात. तटस्थ पंच आले, तिसरे पंच आले, डीआरएस (DRS) प्रणाली आली, टेलिव्हिजन रिप्ले आले, तंत्रज्ञान आले तरी या स्थितीत फरक पडला नाही पण एक पंच याला अपवाद ठरले आहेत. पंचांच्या वाट्याला क्वचितच येणारे कौतूक त्यांच्या वाट्याला आले आहे. ते पंच म्हणजे आपले नितीन मेनन (Nitin Menon). अलीकडच्या इंग्लंडविरुध्दच्या सामन्यांमध्ये त्यांनी ज्या पध्दतीची पंचगिरी केली ते पाहाता नितीन मेनन चुकूच शकत नाहीत अशी त्यांची ख्याती झाली आहे.

याबाबतची आकडेवारी मोठी बोलकी आहे. इंग्लंडविरुध्दच्या सामन्यांमध्ये नितीन मेनन यांच्या 40 निर्णयांवर रिव्ह्यु घेण्यात आला. त्यातील केवळ पाचच निर्णय बदलले. या 40 पैकी 35 अपील एलबीडब्ल्युचे होते.त्यातील फक्त दोनच निर्णय बदलले.यावरुन मेनन यांची पंचगिरी किती दक्ष होती याची कल्पना येते. पंचगिरी बघून नितीन मेनन यांना बेस्ट पंचाचा पुरस्कार देण्यात यावा अशी इच्छाच क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

मालिकेतील शेवटच्या वन डे सामन्यात कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर डेव्हिड मालन चुकला. जोरदार अपील करण्यात आले. विराट कोहलीने रिव्ह्यु घेतला. पहिल्या दोन रिव्ह्युवेळी वाटले की मालन बादच आहे पण तिसऱ्या व निर्णायक रिप्लेवेळी चेंडू स्टम्पच्या बाहेर जात होता हे दिसून आले. ते बघून भारतीय खेळाडू दंगच राहिले कारण त्यांना विश्वास होता की मालन बादच आहे पण तंत्रज्ञानाने सिध्द केले की मेनन यांचा निर्णय पुन्हा एकदा बरोबर होता.

37 वर्षीय मेनन यांची यंदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्वोत्तम पंच मंडळात ( ICC Elite Panel of Umpires for the season 2020-’21) निवड करण्यात आली आहे. या मंडळात स्थान मिळालेले ते श्रीनिवास वेंकटराघवन व सुंदरम रवी यांच्यानंतरचे ते पहिलेच भारतीय पंच आहेत. या तिघांत ते सर्वात कमी वयाचे आहेत. ते मूळचे मध्यप्रदेशातील इंदूरचे असून त्यांनी विविध वयोगटात मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय विभागीय वन डे सामन्यांतही त्यांनी मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. पण क्रिकेटपटू म्हणून ते फार चमक दाखवू शकले नाहीत. वयाच्या 22 व्या वर्षीच त्याने खेळणे सोडले. अशावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला ज्याच्याने त्याचे आयुष्य बदलले.

नितीन यांचे वडील नरेंद्र मेनन यांनीसुध्दा मध्यप्रदेशसाठी 51 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यानंतर ते पंचगिरीकडे वळले. चार आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांतही ते पंच होते. त्यांनीच नितीनला सांगितले की तूसुध्दा पंच हो. 2006 मध्ये माझ्या वडिलांनी मला क्रिकेट मंडळाची पंचाची परिक्षा देण्यास सांगितले. मला पंचगिरीत आनंदही यायला लागला. पंच म्हणून पहिल्या वर्षातच आपण पुढे पंचच रहायचे हा निर्णय जवळपास पक्का झाला असे ते सांगतात.

फार कमी काळात आयसीसीच्या पॕनलमध्ये स्थान मिळाल्याबद्दल ते म्हणतात की, पंचासाठी सर्वोच्च स्तरावर लवकर पोहोचल्याचा मला आनंद आहे. फार मेहनत घेतली आहे. प्रत्येक पंचाचे हे स्वप्न असते.

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ती 100 टक्के अचुक नसते. त्यामुळे बाॕल ट्रॕकिंगचे तंत्रज्ञान जोवर अचूक होत नाही तोवर क्रिकेटमध्ये अंपायर्स काॕल कायम राहिल असे त्यांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button