नितीन गडकरीजी, तब्येत सांभाळा !

nitin gadkari copy

badgeभाजपचे हेवीवेट नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा आज भोवळ आली. सोलापूरमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असताना गडकरी एकदम खुर्चीत बसले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे. असे काही होण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधीही दोन वेळा भरकार्यक्रमात त्यांना भोवळ आली आहे. वारंवार असे होणे चांगले नाही. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. लठ्ठपणा आहे. मधुमेहासोबत येणाऱ्या इतर व्याधीही सतावत असतील. अलीकडे त्यांनी जगण्यात खूप वक्तशीरपणा, शिस्त आणली आहे; पण त्यांनी तब्येतीची आणखी काळजी घेतली पाहिजे, असे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांना वाटते; कारण त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. खूप काही काम त्यांना करायचे आहे.

नितीन गडकरी कामाला वाघ आहेत. दिलेल्या जबाबदारीचे सोने करताना ते स्वतःला विसरून जातात. रस्ते वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षांत  केलेल्या कामांची विरोधकांनीही प्रशंसा केली आहे. राजकारणापलीकडे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ह्या चाहत्यांच्या कानावर अशी वार्ता येते तेव्हा त्यांना वाटणारी काळजी अनेकांनी बोलून दाखवली आहे. गडकरीच नव्हे तर बहुतेक राजकीय नेते तब्येतीची हेळसांड करताना पाहायला मिळतात. राजकारण म्हटले की वेळेचा काही भरवसा नसतो. खाणे, झोपणे सारेच भगवान भरोसे. अनेक राजकीय नेत्यांना लोकांच्या गराड्यात राहणे आवडते. ते एक प्रकारचे व्यसन आहे. काही मर्यादेपर्यंत पुढाऱ्याने लोकांना सामोरे गेले पाहिजे; पण त्याचा अतिरेक नको. लोकांनीही नेत्यांकडून फालतू अपेक्षा ठेवू नये. बाथरूमपर्यंत लोक नेत्याचा पिच्छा करताना दिसतात. आपले काम नेत्याने करून द्यावे, अशी लोकांची अपेक्षा असते. त्यात वावगे काही नाही; पण पुढारी व्यक्तिगत समस्या सोडवायला बसला तर देशाच्या आणि राज्याच्या समस्यांकडे कोण पाहील?