स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रवाद गरजेचा : नितीन गडकरी, धर्माध शक्तींपासून सावध!

नवी दिल्ली :- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रवाद गरजेचा आहे. त्याचप्रमाणे आपण धर्माध शक्तींपासून सावध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी सदर प्रतिपादन केले. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, धर्माध शक्तींचे सत्ता काबीज करणे सुरूच राहिले, तर समाजवाद, लोकशाही आणि सर्वधर्म समभाव शिल्लकच राहणार नाही. सावरकरांच्या राष्ट्रवादाचा सन्मान करण्याची आज गरज आहे. आपण या देशाची फाळणी झालेली एकदा बघितलीच आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पूर्व सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या एका विधानाचा दाखला दिला. ज्या कुठल्याही देशात ५१ टक्के मुस्लिम आहेत, तेथे लोकशाही, समाजवाद आणि सर्वधर्म समभाव या बाबीच नाहीत. तुर्कीपासून पाकिस्तानपर्यंत अनेक मुस्लिम देश याची साक्ष आहेत, असे बाळासाहेब देवरस एका भाषणात म्हणाल्याची आठवण यावेळी गडकरींनी करून दिली. असे असले तरी, अनेक ‘प्रगतीशील’ मुस्लिमही आहेत, ज्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यांना शिक्षणाचा प्रसार हवा आहे, मात्र, त्यांची संख्या कमी आहे. पाकिस्तानात अशांना मारले जाते. बांगलादेशात, मात्र, वेगळी स्थिती आहे. आपण जगभरातील प्रगतीशील आणि उदारमतवादी मुस्लिमांना मदत करायलाच हवी, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.