नितीन गडकरींनी घेतली जोशी सरांची भेट

मुंबई :  राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून मनोहर जोशी वयोमानापरत्वे दूर झाले असले तरी आजही दिग्गज नेत्यांशी त्यांचे घट्ट नाते आहे. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सदिच्छा भेट घेतली. गडकरींनी मनोहर जोशींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आले असले तरी दोन्ही पक्षांतील दिग्गज नेते राजकारणापलीकडची नाती जपताना दिसतात. नितीन गडकरी आणि मनोहर जोशींच्या भेटीने हे अजूनच अधोरेखित होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात आजही ‘आपल्या मुख्यमंत्र्यां’विषयी स्नेह आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे पक्षातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेम आणि आदराने ‘सर’ असे संबोधले जाते. मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री होते.

जोशींच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. या भेटीच्या निमित्ताने गडकरी-जोशींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER