गडकरी-फडणवीस यांना धक्का

Nitin Gadkari And Fadnavis Editorial

badgeराज्यातील सहा जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आज लागले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ग्रामीण भागाचा काय कौल मिळतो याकडे सर्वांचे लक्ष होते. धुळ्यातील दणदणीत विजय सोडला तर भाजपसाठी आजचे निकाल आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची जादू कायम असल्याचे दिसते तर वाशिममध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला दिसतो. पालघर आणि नंदूरबार जिल्हा परिषदांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. ह्या सर्व निकालांमध्ये नागपूरचा निकाल सर्वांत धक्कादायक आहे. तेथे गेली साडेसात वर्षे भाजपच्या हाती असलेली जिल्हा परिषद दोन काँग्रेसच्या आघाडीने हिसकली आहे.

नागपूरचा निकाल धक्कादायक यासाठी की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या भाजपच्या दिग्गज नेत्यांचा हा गृहजिल्हा आहे. नागपुरात भाजप हरू शकते म्हणजे मग कुठेही हरू शकते. ह्या निकालाने अनिल देशमुख, सुनील केदार यांचे वजन वाढले आहे. गडकरी-फडणवीस यांनी जिल्हा परिषदेसारखी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी दोघांनीही सभा करून जिल्हा ढवळून काढला. तरीही गडकरी यांच्या धापेवाडा गावात तसेच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गडात काँग्रेसचे झेंडे फडकले. नुकतेच गृहमंत्री झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल यांनीही बाजी मारली.

याचा अर्थ वारे उलटे वाहू लागले आहे. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचे तिकीट भाजपने कापले होते. त्यामुळे तेली समाजात आलेली नाराजी अजूनही गेलेली नाही असे दिसते. गडकरी-फडणवीस यांनी जिल्ह्याला याआधी कधी मिळाले नसतील एवढे पैसे विकासकामांसाठी ओतले. पण लोक विकासावर मतं देतात की काही वेगळे गणित आहे, असा प्रश्न यातून निर्माण होतो. स्थानिक राजकारण मोठे वेगळे असते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा जिंकणे सोपे असते. विधानसभा जिंकून मंत्री झालेले नंदूरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांच्या पत्नीला आज जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेकडून पराभूत व्हावे लागले. गावच्या निवडणुकांचा थरार टिकून आहे तो ह्यामुळे.

शिवसेनेने दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन सरकार बनवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. शतप्रतिशतचा नारा देणाऱ्या भाजपला महाआघाडीच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्या लागल्या आहेत. शिवसेनाही स्वबळावर लढली आहे. शिवसेनेची ग्रामीण भागात तशी ताकद नव्हतीच. पण काँग्रेसचे आव्हान संपलेले नाही, नागपूर ‘काँग्रेसमुक्त’ झालेला नाही हेच आजच्या निकालांनी दाखवून दिले.