सावित्री नदीवरील नव्या पुलाचे मुख्यमंत्री, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

रायगड : मागल्या वर्षी १ ऑगस्टच्या त्या काळ्या रात्री महाड मधील सावीत्री नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळले होते. यात ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर या नदीवरील नवा पूल पुन्हा उभा राहिला असून आज (सोमवार) या पूलाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दुर्घटनेतील मृतकांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.

या दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी १८० दिवसांत हा पूल नव्याने बांधण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे,’ सरकारने केवळ १६५ दिवसांत नव्या पुलाचे काम पूर्ण केले. नव्या पुलाची लांबी २३९ मीटर असून, रुंदी १६ मीटर आहे. याच्या निर्मितीसाठी एकूण ३५.७७ कोटी एवढा खर्च लागला आहे. आजच्या उदघाटनानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

या पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की,’ येत्या डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने लवकर भूसंपादन करून देण्याच्या सूचना गडकरी यांनी केली. गडकरी यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या दोन ते तीन महिन्यात भूसंपादनाचं काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणचे भाग्य उजळणारा मार्ग ठरेल असे मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच रायगडचा येत्या तीन वर्षांत विकास करु, असे ही मुख्यमंत्री म्हणालेत.